

Forest department's firm claim that it was not a tiger but a leopard seen in Ajanta Caves
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत बिबट्या दिसण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि.२२) पट्टेदार वाघाने अजिंठा लेणीत दर्शन दिल्याचा दावा अजिंठा लेणीत आलेल्या पर्यटकांनी केला होता. पर्यटकांच्या या दाव्यामुळे फर्दापूरसह अजिंठा लेणी परिसरात एकच खळबळ उडून गेली. मात्र बुधवारी (दि.२३) अजिंठा लेणीत दिसलेला प्राणी वाघ नसून, बिबट्याच असल्याचे वनविभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अजिंठा राखीव जंगलात बिबट्याचा अधिवास मोठ्या प्रमाणात असल्याने याठिकाणी बिबट्याचे दर्शन अनेकदा घडते. बिबट्या दिसणे हे अगदी सामान्य बाब मानली जात जाते. या ठिकाणी बिबट्या नव्हे तर पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याचा ठाम दावा अजिंठा लेणी सफरीवर आलेल्या पर्यटकांनी केला होता. यापूर्वी सन २०१६-१७ मध्ये तेलंगणामार्गे मराठवाड्यात आलेल्या विदर्भातील एका अभरण्यातील वाघाने महिनाभर अजिंठा लेणीच्या जंगलात मुक्काम केला होता. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा अजिंठा लेणीत पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याचा दावा पर्यटकांकडून करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता.
जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील पावसाळी पर्यटन हंगामाला सुरुवात झाल्याने मागील काही दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसत आहे. मंगळवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास अजिंठा लेणी सफरीवर आलेले पर्यटक येथील भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालया पाठीमागील वाघुर नदी व त्या पलीकडील राखीव जंगलातील निसर्गसौदर्य न्याहळत असताना काही पर्यटकांना डोंगराच्या मध्यभागी एक वन्यप्राणी फर्दापूर टीपॉइंट ते कालिकामाता खोऱ्याकडील जंगलाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. काही पर्यटकांनी मोबाईलमध्ये त्या वन्यप्राण्याचे छायाचित्रण ही केले.
सदरील वन्यप्राणी वाघ असल्याचा दावा या पर्यटकांनी केला, मात्र उंच डोंगरातून जाणारा तो प्राणी विबट्या की वाघ हे लांबून घेतलेल्या मोबाईल छायाचित्रणावरून ओळखणे अवघड असल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. दैनिक पुढारी प्रतिनिधीने पर्यटकांशी संवाद साधला असता मोबाईल छायाचित्रण लांबून केले. आमच्यापासून जवळपास पाचशे फूट अंतरावर अंगावर पट्टे असलेला तो वन्यप्राणी वाघच असल्याचा दावा त्या पर्यटकांनी केला. दैनिक पुढारी प्रतिनिधीने वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्याशी संवाद साधला. त्यांनी पर्यटकांचा दावा खोडून काढत अजिंठा लेणीत दिसलेला वन्यप्राणी वाघ नसून विवट्याच असल्याचे स्पष्ट केले.
आपल्या जंगलात वाघाच्या अधिवासासाठी आवश्यक असलेली भोगौलिक स्थिती नाही. त्यामुळे या ठिकाणी वाघ दिसणे शक्य नाही. मंगळवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओतील प्राणी शंभर टक्के बिबट्याच आहे. वाघाला रेडिओ कॉलर आवडीने टॅग केलेले असते. त्यामुळे वाघाने स्थलांतर केल्यास त्याचे लोकेशन व सूचना आम्हाला मिळतात. तशा कोणत्याही सूचना सध्या आम्हाला आलेल्या नाहीत.