

Chhatrapati Sambhajinagar Cleaner killed in truck accident
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
लोखंडी सळई घेऊन जालना येथून पुण्याला निघालेला भरधाव ट्रक उड्ड-ाणपुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात क्लीनर जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी (दि.११) मध्यरात्री दीडच्या सुमारास बीड बायपासवरील वखार महामंडळासमोर घडला. लक्ष्मण बाळासाहेब धोत्रे (४३, रा. गोरे वस्ती वाघेश्वरनगर, वाघोली, पुणे) असे मृताचे नाव आहे. तर चालक आकाश अशोक राठोड (२८, रा. वाघोली) हाही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी दिली.
जालना येथून २० टन सळई घेऊन ट्रक चालक (एमएच -१२- क्युजे-२९७५) राठोड आणि क्लीनर धोत्रे हे रात्री अकराच्या सुमारास पुण्याला निघाले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास एमआयटी महाविद्यालयासमोर येताच उड्डाणपुलावरून खाली येताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला. अतिवेगात ट्रक असल्याने पाठीमागील सळई थेट केबिनला भेदून २० फुटांपर्यंत पुढे फेकल्या गेल्या. त्यासोबतच ट्रकची केबिनही तुटून सळईसोबतच पुढे फेकल्या गेली.
या घटनेत केबिनचा पार चुराडा झाला. चालकाची बाजू दुभाजकाला धडकल्यामुळे त्या बाजूने धक्का लागून सळया क्लीनरच्या बाजूने पुढे फेकल्या गेल्या. यात क्लीनर लक्ष्मण धोत्रे ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांच्यासह सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मृत दोघांना घाटीत हलविले. ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घाटीतील डॉक्टरांनी धोत्रे यांना तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास जमादार पृथ्वीराज चव्हाण, एएसआय जगदाळे करत आहेत.