

Sanjay Shirsat: We are not impatient for the mayor's post
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापौरपद मिळावे इतके आमचे बळ नाही. आम्ही एवढे उतावळले नाहीत. भाजपचा महापौर होईल हे निश्चित आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना महापौरपदावर भाष्य केले.
महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती. त्यात भाजपला सर्वाधिक ५७ जागा मिळाल्या. त्यापाठोपाठ एमआयएमला ३३, शिंदेंच्या शिवसेनेला १४, शिवसेना उबाठा पक्षाला ६, वंचित बहुजन आघाडीला ४, काँग्रेसला १ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. बहुमतासाठी ५८ जागांची गरज आहे. महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजपला आणखी केवळ एका सदस्याच्या पाठिंब्याची गरज असून त्यासाठी भाजपने छोट्या पक्षांशी चर्चा सुरू केली आहे.
शिंदेसेनेला सोबत घेण्याऐवजी इतर छोट्या पक्षांची मदत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यावर आज शिंदेंच्या सेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले. ते म्हणाले, संख्याबळ भाजपकडे आहे, त्यामुळे भाजपचा महापौर होईल हे नक्की. आमचे संख्याबळ नाही, त्यामुळे आम्ही आमचा महापौर होईल असे म्हणणार नाही, आम्ही एवढे उतावीळ नाहीत. त्यांचे संख्याबळ जास्त आहे, त्यांचा महापौर होईल आणि आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही शिरसाट म्हणाले.
जिल्हा परिषदेत युती राखण्याचा प्रयत्न
जिल्हा परिषदेसाठी शिवसेना भाजपची युती झाली आहे. तरीदेखील काही ठिकाणी दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात बी फॉर्म दिले गेले. माघार घेण्याच्या मुदतीपर्यंत आम्ही एकमेकांविरोधात अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची समजूत घालू. युती राखण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जाईल, जिथे उमेदवार ऐकणार नाहीत, तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल, परंतु त्या ठिकाणी पक्षाचे नेते प्रचारासाठी जाणार नाहीत, असेही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.