

Five Arrested Samruddhi Expressway
वैजापूर : समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगाव इंटरचेंजजवळ वाहन अडवून चालकाच्या कानशिलात मारत सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चैन लुटणाऱ्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत दिल्ली, नाशिक आणि बीड येथून जेरबंद केले. या कारवाईमुळे महामार्गावरील लूटप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी राहुरी (जि. अहिल्यानगर) येथील एक व्यक्ती समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगावजवळील इंटरचेंजवरून वाहनाने प्रवास करत होती. त्यावेळी अज्ञात आरोपींनी वाहन अडवले. चालकाने वाहनाची काच खाली करताच आरोपींनी त्याच्या कानशिलात मारून गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान २९ ऑगस्ट रोजी किरण अजिनाथ गायकवाड (वय २५, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, जि. बीड) याला रायमोहा येथून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत सराईत गुन्हेगार परशुराम मोहन गायकवाड हा साथीदारासह दिल्लीला पसार झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिस पथकाने दिल्लीतील प्रसादनगर परिसरातून परशुराम मोहन गायकवाड (वय २६) आणि करण भरत जाधव (वय २२, रा. मिडसावंगी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, ह.मु. बीड) यांना ताब्यात घेतले.
गुन्ह्यात वापरण्यात आलेले काळ्या रंगाचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून, वाहनमालक अनिल जयराम जाधव (रा. नाईकनगर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर) याला येवला, नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच पंडित उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे (रा. सैनिक विद्यालय परिसर, बीड) याला बीड शहरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशीनंतर या पाचही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, वैजापूर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलिस आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकाने केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी परशुराम मोहन गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण, बीड, पुणे, बुलढाणा, धाराशिव, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात तो फरार होता.