

Sambhajinagar ZP's sting in the entire state in Sevakarmi Plus
छत्रपती संभाजीनगर, शहर प्रतिनिधी राज्य शासनाच्या प्रशासनाला अधिक गतिमान व आधुनिक बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या सेवाविषयक सुधारणा कार्यक्रमात सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने राज्यात आपल डंका वाजवत अव्वल स्थान पटकावले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शनिवारी (दि. २८) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून सेवाविषयक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. राज्यातील पूरस्थितीमुळे या उपक्रमास १० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राघवेंद्र घोरपडे यांनी केली.
जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रशासनात लक्षणीय सुधारणा घडून आल्या शासनस्तरावरील गुणांकनात उत्कृष्ट कामगिरी करत संभाजीनगर झेडपीने राज्यात अव्वल स्थान पटकावले.
संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल
प्रशासकीय सुधारणांवर केंद्रित या उपक्रमात कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करणे, पदोन्नती प्रक्रिया राबविणे, बिंदूनामावली अद्ययावत करणे, अनुकंपा व सरळसेवा भरती, केंद्र शासनाच्या आयजीओटी पोर्टलवर नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करणे तसेच सेवापुस्तिका अद्ययावत ठेवणे या बाबींचा समावेश होता. या सर्व घटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली.