

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी (दि.16) सकाळी मोठा राडा झाला. मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यावरून पोलिस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी माजी महापौर विकास जैन यांना पोलिसांनी अक्षरश: घेरून मारले. यात जैन यांच्याह चौघे जण जखमी झाले.
मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी केंद्रात जाण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी ज्यांच्याकडे प्रवेशपत्र होते, त्यांनाही अडविण्यात आले. त्यावरून शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी अचानक लाठीचार्ज सुरू केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविले. शेवटी माजी महापौर विकास जैन आणि इतर जण तिथे होते, त्यांना पोलिसांनी घेरून मारले. यात विकास जैन, उमेदवार राजू राजपूत यांचे चिरजीव आणि इतर दोघे जखमी झाले.
या घटनेमुळे उमेदवारांसह मतमोजणीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी ठिय्या आंदोलन करत मतदान मोजणी प्रक्रिया ठप्प करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे फोनवरून राग व्यक्त केला. आयुक्तांनी घटनास्थळी भेट देत या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून कारवाई करण्याचा शब्द दिल्यानंतर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. त्यानंतर मतमोजणी केंद्रातील तणाव निवळला. त्यानंतर जैन आणि इतर जखमींना रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांना कसली मस्ती : पालकमंत्री
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घटनास्थळावर येऊन तीव संताप व्यक्त केला. पोलिसांना कसली मस्ती आहे. मोजणीसाठी आलेल्या प्रतिनिधींवर लाठीचार्ज करणे ही कुठली कायदा व व्यवस्था आहे, असे मंत्री शिरसाट म्हणाले. यावेळी दिवसभरात दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी सूचना पालकमंत्री शिरसाट यांनी पोलिस आयुक्तांना केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींशी फोनवर संपर्क साधला.
मारहाण चुकीची : पोलिस आयुक्त
कुणालाही अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचे आहे. परंतु ही घटना का घडली, मारहाण का हे तपासले जाईल. दोन्ही बाजूंची माहिती घेतल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.