

ठाणे : दिलीप शिंदे
ठाणे महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांचे बंधू राजेंद्र फाटक तसेच पालिकेत सलग आठ जेष्ठ नेते देवराम भोईर हे निवडून आले आहेत. एवढेच नाही तर दोन सुना आणि मुलगासह चार नगरसेवक सलग दोन वेळा निवडून येण्याची किमया साधली आहे.
भाजपचे कृष्णा पाटील आणि पत्नी नंदिता पाटील दाम्पत्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला असून शिवसेनेचे योगेश जानकर आणि त्यांची पत्नी डॉ. दर्शना जानकर, माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला किणी आणि मुलगा मंदार किणी ही मायलेक आणि सेनेचे रमाकांत मढवी आणि साक्षी मढवी ही बाप लेकीची जोडी निवडून आली आहे. तब्बल 75 माजी नगरसेवक पुन्हा सभागृह पोहचले आहे.
ठाणे महापालिकेच्या 131 प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षित यश शिवसेना- भाजप युतीला आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभरपेक्षा अधिक जागा जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांची रणनीती यशस्वी झाली. भाजपाने 28 जागा जिंकून त्यांना फक्त चार जागा अधिकच्या जिंकता आल्या. शिवसेनेशी केलेल्या युतीला त्यांना फारसा फायदा झालेला दिसत नाही. राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाने अपेक्षित 9 जागा जिंकल्या आहेत.
शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी राबोडीतील चार नगरसेवक जिंकून आणण्याची किमया कायम टिकवली. मात्र मुंब्र्यातून पत्नी अनिता किणे आणि पॅनेलमधील तीन उमेदवारांचा पराभव राजन किणे यांच्या जिव्हारी लागला आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडल्याचा फटका जसा काँग्रेसला बसला आहे तसा तो राष्ट्रवादी काँग्रेसलाही बसलेला दिसून येतो. काँग्रेस खाता ही उघडता आला नाही.
शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना स्वतःची जागा ही राखता आली नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडून त्यांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आणि पक्षालाही खड्ड्यात घातल्याचे चित्र निकालातून दिसून आले. आमदार जिंतेद्र आव्हाड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 12 जागा जिंकता आल्या. त्यांना मुंब्रा राखता आले नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आव्हाड यांचे उमेदवार पराभूत झाले आणि एमआयएमचे पाच नगरसेवक जिंकून आले. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाची वाताहत झालेली दिसून आली.
शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांना पत्नी नंदिनी विचारे यांचीही जागा राखता आले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास सहकारी माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव करणारे शहाजी खुस्पे या एकमेव नगरसेवकामुळे ठाकरे शिवसेनेची अब्रू वाचवली. ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठाकरे यांच्या पक्षाला फक्त एकच जागा जिंकता आली. याच ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली होती.
शरद पवार गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रमिला किणी यांनी विजयी पताका फडकवली आणि शिवसेनेचा निर्णय कसा चुकला हे दाखवून दिले. मनसे , काँग्रेसप्रमाणे वंचित, आप , समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांना देखील खाते उघडता आले नाही. कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यावरून राजीनामा नाट्य रंगल्याने साऱ्यांचे लक्ष वेधणाऱ्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे ह्यांनी पूर्ण चारचा पॅनल जिंकून आणत नेत्याच्या विश्वास जिंकला. दुसरे माजी महापौर अशोक वैती हे पराभूत झाले.
माजी उपमहापौर मुकेश मोकाशी , रमाकांत मढवी हे विजयी झाले असून माजी विरोधी पक्ष नेत्या प्रमिला किणे, मिलिंद पाटील, नजीब मुल्ला, शानू पठाण, प्रकाश बर्डे, अनिता गौरी, मनोज शिंदे सर्व माजी विरोधी पक्ष नेत्यांनी विजयी पताका फडकली आहे. शिवसेनेचे बंडखोर भूषण भोईर, मधुकर पावशे, रवी घरत, नितीन लांडगे, किरण नाकती, सेनेच्या कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांची सून, विकास दाभाडे, माजी महापौर हरिचंद्र पाटील यांचा मुलगा विकी पाटील आदी पराभूत झाले आहेत.