Uddhav Thackeray on Marathwada Development
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविरोधात गुरुवारी (दि. १७) छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला ‘तुमसे ना हो पायेगा’ असे नाव देण्यात आले आहे. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर देत, ‘आम्ही यापूर्वी करून दाखविले आहे आणि आताही करून दाखवू,’ असे म्हटले. तसेच त्यांनी या आंदोलनाला ‘नाकर्त्यांचे आंदोलन’ असे संबोधले.
मराठवाड्यातील विविध प्रश्नांवरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा)कडून मागील काही दिवसांपासून तहसील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या स्तरावर आंदोलने करण्यात येत आहेत. बुधवारी रात्री उद्धव ठाकरे मुंबईहून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. शहरात आल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी सरकारच्या कामगिरीचा दाखला देत विरोधकांवर टीका केली. ‘आम्ही यापूर्वीही करून दाखविले आणि आताही करून दाखवू,’ असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. ‘सकाळी एक बोलतात आणि संध्याकाळी दुसरेच बोलतात,’ असा टोला फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले २० दिवसांचे उपोषण गुरुवारी मागे घेतले. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. सरकारच्या उपसमितीने मान्य केलेल्या मागण्यांबाबत दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका सकारात्मक राहिली असून, सरकारने आतापर्यंत घेतलेले निर्णय यापूर्वीच्या सरकारांनी घेतले नसल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.
गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन शांततेत संपल्याने सणासुदीच्या वातावरणात कोणतेही विघ्न आले नाही, याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार प्रसाद लाड, मंत्री उदय सामंत आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांचे त्यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात पुढील महिनाभर विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.