

Farm Fire Short Circuit Soygaon
जरंडी : सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ज्वारीच्या कणसांच्या गंजीसह चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी खंडु उखर्डू वानखेडे यांच्या गट क्रमांक ७० मधील सुमारे अडीच एकर क्षेत्रातील ज्वारीच्या कणसांच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण करत ज्वारीचे कणसे आणि चारा पूर्णपणे जळून खाक झाला.
या आगीचा फटका शेजारील शेतकरी परशुराम सीताराम पवार यांनाही बसला असून त्यांच्या मोसंबीच्या बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणकडून पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.