

छत्रपती संभाजीनगर : तीन फूट जागेच्या वादातून एकाच समाजातील दोन गटांत किरकोळ हाणामारी होऊन थेट घरावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ७ वाजेच्या सिल्लेखाना भागात घडली. भरवस्तीत झालेल्या या दगडफेकीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. क्रांती चौक पोलिसांसह घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक आयुक्त सागर देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लेखाना भागात राहणारे नजीर भंगारवाले आणि अबरार बाली यांच्यात ३ फूट जागेवरून जुना वाद आहे. एका मोकळ्या जागेवर एका गटाचे आधीपासूनच पत्र्याचे शेड आहे. हे शेड आणखी ३ फूट पुढे वाढवून तेथे कच्चे बांधकाम करण्याचा एका गटाचा प्रयत्न होता. मात्र, या बांधकामाला त्याच समाजातील दुसऱ्या गटाने तीव्र विरोध केला.
या जागेच्या पाठीमागे एक धार्मिक स्थळ आहे. जर तुम्ही हे ३ फूट कच्चे बांधकाम करून आणखी पुढे आलात, तर पाठीमागे मुलांना खेळण्यासाठी जागाच उरणार नाही आणि परिसराची कोंडी होईल, असा आक्षेप घेत दुसऱ्या गटाने हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
संतापलेल्या जमावाने थेट एका गटाच्या घरावर तुफान दगडफेक सुरू केली. सुमारे १५ ते २० मिनिटे चाललेल्या या दगडफेकीमुळे एका घराचा दरवाजा आणि खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. सायंकाळची वेळ असल्याने परिसरात मोठी वर्दळ होती.
अचानक खिडक्यांवर दगड येऊ लागल्याने महिला आणि लहान मुलांमध्ये मोठी घबराट उडाली. रस्त्यावर दगडफेक सुरू झाल्याचे पाहून काही काळ वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली होती. या राड्याची माहिती क्रांती चौक पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे, उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सिल्लेखाना हा शहरातील अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो.
या भागात नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद उफाळून येतात. गांभीर्य ओळखून परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनीही तत्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आक्रमक झालेल्या जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दगडफेक करणाऱ्या तरुणांची ओळख पटवली जात असून, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.