

Sambhajinagar Repair of 'That' Dangerous Chamber
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दमडी महल ते चंपा चौक मार्गावरील चौकात तुटलेल्या स्टॉर्म वॉटर चेंबरच्या झाकणामुळे गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेला अपघाताचा धोका अखेर दूर झाला असून, दैनिक पुढारीच्या यासंदर्भातील वृत्ताची मनपाकडून तातडीने दखल घेत दुरुस्ती करण्यात आली आहे.
दमडी महल ते चंपा चौक मार्गावरील मध्यवर्ती चौकात असलेल्या स्टॉर्म वॉटर चेंबरचे झाकण मागील चार दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत होते. अपघात होण्याची शक्यता वाढली होती. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी हा भाग अत्यंत धोकादायक ठरत होता.
त्यामुळे परिसरातील सजग नागरिकांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या खड्याभोवती पेव्हर ब्लॉक्स व लाकडी फळ्या ठेवून इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी दैनिक पुढारीत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मनपाने तातडीने कारवाई केली. संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींनीही याची दखल घेत प्रशासनाला सूचित केले होते.
त्यानंतर शनिवारी (दि.११) सकाळपासूनच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मनपाच्या पथकाने तुटलेले जुने झाकण काढून त्याऐवजी मजबूत लोखंडी जाळी बसवली. या नव्या व्यवस्थेमुळे वाहनचालकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून, अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मनपाने वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा अपघात टळल्याची भावना व्यक्त करत प्रशासनाच्या तत्परतेचे स्वागत करण्यात आले.
कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
हा रस्ता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आला असून, संबंधित ठेकेदारावर दहा वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या त्रुटीवरून कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.