

A Death Trap on the Damdi Mahal–Champa Chowk Route
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दमडी महल चंपा चौक मार्गावर मृत्यूचा सापळा बनला असून, या चौकातील १०० फूट रस्त्याच्या मध्यभागी स्टॉर्म वॉटर चेंबरचे झाकण तुटून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्याला तीन दिवस उलटून गेले असून, अद्यापही मनपा प्रशासनाने घेतलेली नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत दमडी महल ते चंपा चौक या रस्त्याचे सुमारे तीन वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले होते. संबंधित ठेकेदाराला १० वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. असे असूनही प्रत्यक्षात रस्त्याची गुणवत्ता खालावल्याचे दिसून येत आहे. याच मार्गावर यापूर्वीही पेव्हर ब्लॉक उखडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला होता.
तसेच अलीकडे करण्यात आलेल्या दुरुस्तीत स्टॉर्म वॉटर चेंबरवर बसविण्यात आलेले झाकण निकृष्ट दर्जाचे असल्याने ते तुटले आणि रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक खड्डा तयार झाला. या खड्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी खड्याभोवती पेव्हर ब्लॉक ठेवून व इशाऱ्यासाठी झाडाची फांदी लावून तात्पुरती उपाययोजना केली आहे.
मात्र महापालिकेने त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रभागातील चार नगर-सेवकांपैकी तिघांचा याच मार्गावरून नियमित प्रवास होत असतानाही त्यांनी समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तातडीने दुरुस्तीची मागणी
दमडी महल ते चंपा चौकदरम्यान वहातुकीचे प्रमाण अधिक असून, या धोकादायक खड्ड्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खड्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.