

The arrival of the lion Siddhartha Udyan the occasion Ghatasthapana
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानातील ३ वाघ कर्नाटकच्या प्राणि संग्रहालयाला देण्यात येणार आहेत. तर तेथील सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी शहरात आणण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १८ सप्टेंबरला महापालिकेचे पथक कर्नाटकमधील शिवमोग्गा प्राणि संग्रहालयाला जाणार आहेत. त्यानंतर २३ सप्टेंबरपर्यंत प्राण्यांची देवाणघेवाणी प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावरच सिद्धार्थ उद्यानात सिंहाची डरकाळी फुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिद्धार्थ उद्यानचे वातावरण हे वाघांच्या जन्मासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणि संग्रहालयालयात वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. उद्यानातील पिंजऱ्यांची जागाही वाघांना फिरण्यासाठी कमी पडते व सध्या उद्यानात तेवढ्या क्षमतेचे अतिरिक्त पिंजरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या नर-मादी वाघांना वेगवेगळे ठेवले जात आहे.
प्राणिसंग्रहालयात दररोज हजारो पर्यटक व नागरिक वन्य प्राणी पाहण्यासाठी येतात. या उद्यानातील प्राणिसंग्रहालयात महापालिकेच्या या यापूर्वी सिंहाच्या जोडीसह वाघ, बिबट्या, अस्वल, हत्ती, मगर, कोल्हा, हरण, काळविट, सांबर, निलगाय, शहामृग, लांडगा, सायाळ, लाल माकड असे विविध प्राणि होते. मात्र, यातील काही प्राणी मरण पावले आहेत. त्यात सिंहाच्या जोडीचाही समावेश असून २० वर्षांपासून उद्यानात सिंह नाही.
उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाला सिंहाची जोडी मिळू शकली नाही. सिंह नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. सुदैवाने कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाकडून वाघांच्या जोडीची मागणी आल्याने सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाला त्याबदल्यात सिंह, अस्वल आणि कोल्ह्याची जोडी उपलब्ध होत आहे. सध्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात ७ पिवळ्या पट्ट्याचे वाघ आणि ५ पांढऱ्या पट्ट्याचे वाघ आहेत.
शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी दोन महिन्यांपूर्वीच सिद्धार्थ उद्यानात येऊन वाघांच्या जोडीची पाहणी करून गेले. पांढरे आणि पिवळे वाघ पाहताच त्यांना पसंत पडले आहेत. त्यामुळे आता घटस्थापनेपूर्वी आम्हाला वाघ द्या, अशी मागणी सतत कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणि संग्रहालयाकडून महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाला होत आहे.
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयामध्ये जन्मलेल्या वाघांपैकी श्रावणी, रोहिणी आणि विक्रम नाम वाघ कर्नाटकला दिले जाणार आहेत.