

Sambhajinagar News: Woman made to work on a cutter machine; four fingers severed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : साफसफाईचे करणाऱ्या महिलेला कोणतेही प्रशिक्षण किंवा सुरक्षा साधने न देता लाकूड कापण्याच्या कटर मशीनवर काम करण्यास भाग पाडल्याने तिच्या उजव्या हाताची चार बोटे तुटल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा ए मआयडीसीतील विराज एंटरप्रायजेस येथे घडली.
याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात कंपनी मालक नीलेश नानोटी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अलका रमेश चित्रक (४५, रा. मयुरपार्क, शिवनेरी चौक) या संबंधित कंपनीत महिन्याला १० हजार रुपये मानधनावर
साफसफाईचे काम करतात. १० जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर असताना मालकाने त्यांना लाकूड कापण्याच्या मशीनवर फळ्या कापण्याचे काम करण्यास सांगितले. यापूर्वी कधीही हे काम केले नसल्याचे सांगून त्यांनी नकार देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना ते काम करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे.
दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास काम सुरू असताना त्यांचा उजवा हात कटर मशीनमध्ये अडकला आणि हाताची चार बोटे तुटली. गंभीर जखमी झालेल्या अलका चित्रक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बोटे पूर्णपणे तुटल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे.