

Sambhajinagar News : From 1st October discount ticket only through NCMC card
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांनंतर एसटीचे कार्ड असेल तरच सवलतीच्या प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
एसटीकडून विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ व डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. राज्यभरातील एसटी आगार व बसस्थानकांवर कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट या कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिला सवलतधारक प्रवाशांनी यापूर्वीच कार्डची नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटीने केले आहे. ज्यांच्याकडे कार्यरत कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची क्युआर कोड असलेली पावती आहे, अशा प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार आहे.
नोंदणी पावती ३० दिवस ग्राह्य
या कार्डची नोंदणी केल्यानंतर मिळालेली क्यूआर कोडयुक्त पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी कार्ड अक्टीव्ह करून त्यामध्ये आवश्यक ते टॉप-अप करणे अपेक्षित आहे. नोंदणी केलेल्या प्रवाशांना पावतीच्या आधारे वाहकाच्या ईटीएम मशीनवरून सवलतीचे तिकीट मिळणार आहे.
१ ऑक्टोबर एनसीएमसी कार्ड अनिवार्य
नियम सवलतधारकांना लागू
अक्टीव्ह कार्ड किंवा क्यूआर कोडयुक्त नोंदणी पावती आवश्यक
नोंदणी पावती ३० दिवस ग्राह्य
आगार व बसस्थानकांवर नोंदणी-वितरणाची सुविधा उपलब्ध