

Sambhajinagar News: Father and son attacked with intent to kill in Mukundwadi; habitual criminal causes trouble yet again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मुकुंदवाडीतील सुमनांजली मेडिकलजवळ गुरुवारी (दि. १९) सकाळी सहा वाजता क्षुल्लक कारणावरून सराईत गुंडाने ट्रकचालक पिता-पुत्राच्या डोक्यात लोखंडी तवा आणि गजाने हल्ला केला. याप्रकरणी भागवत नारायण भारती (३५, रा. जयभवानीनगर) यांच्या फिर्यादीवरून अक्षय संतोष शिनगारे आणि एका अल्पवयीन विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, मुकुंदवाडी ठाण्यात त्याच्याविरुद्ध वर्षभरातील हा तिसरा गंभीर गुन्हा ठरला आहे. पहिला गुन्हा केल्यावर तो तीन महीने तुरुंगात राहिला. त्यानंतर त्याने एन-२ चौकात रस्त्यावर नाश्ताची गाडी लावली. २ जून २०२६ रोजी पोह्यात मीठ जास्त झाल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाच्या डोक्यात तवा मारून हल्ला केल्याप्रकरणी तो महिनाभर तुरुंगात होता.
जेलमधून जामिनावर बाहेर आल्यावर अवघ्या पाच दिवसांनी, म्हणजेच ३० जून रोजी, त्याने अल्पवयीन साथीदार आणि आई प्रतिभा यांच्या मदतीने राजनगर येथे खकाळ याच्यावर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, गुरुवारी सकाळी भागवत व त्यांचे वडील नारायण केले.
भारती हे ट्रक घेऊन जात असताना एक दुचाकीस्वार अचानक समोर आल्याने त्यांनी ब्रेक लावला. दुचाकीस्वाराला धक्काही लागलेला नसताना अक्षय आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने विनाकारण नारायण यांना खाली ओढून मारहाण सुरू केली. भागवत सोडवण्यास गेले असता आरोपींनी दोघांच्या डोक्यात तवा आणि गजाने वार करून गंभीर जखमी केले.
पोलिसही माझं काही वाकडं करू शकले नाहीत : मला अक्षय शिनगारे म्हणतात, पोलिसही माझं काही वाकडं करू शकले नाहीत, अशी भाषा वापरात त्याने भारती यांना धमकी देत त्यांचा मोबाईल फोडला. दरम्यान, अक्षयवर हत्येचा कट, लूटमार व हत्येचा प्रयत्न असे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. घटनेनंतर पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी अक्षयला बेड्या ठोकल्या. पुढील तपास उपनिरीक्षक अजय शितोळे करत आहेत.