

Ghati ranks number one in the state for patient care facilities
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: रुग्णांना दर्जेदार आणि चांगल्या आरोग्य सेवा देण्यासोबतच वैद्यकीय विद्यार्थी हिताच्या सोयी-सुविधांमध्ये घाटी म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे राज्यातून अव्वल ठरले आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने १० विविध निकषांच्या आधारे केलेल्या 'अधिष्ठाता कार्यक्षमता मूल्यांकनात' घाटीने ऑक्टोबर महिन्यांत पहिल्या क्रमांकावर झेप घेतल्याने अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या नेतृत्वाखालील 'टीम वर्क'वर कौतुक होत आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे व अधिष्ठातांच्या कामगिरीचे मूल्यमापन वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरू केले आहे. प्रत्येक महिन्यात हे मूल्यमापन केले जात आहे. यात ऑक्टोबर महिन्यात घाटीने दहापैकी सात निकषांत १० पैकी १० गुण मिळवले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ८१.४ गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेल्या घाटीने ऑक्टोबरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ८३.६ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला.
उल्लेखनीय बाब म्हणजे नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मागे टाकल्याने ८०.२ गुणांसर दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ७९.४ गुणांसह तिसऱ्या, तर लातूरचे महाविद्यालय ७७.७ गुणांसह चौथ्या क्रमांकावर नि राहिले आहे. राज्यभरातील ३० महाविद्यालयांनी दिलेल्या कामगिरी अहवालावरून विभागाने ही क्रमवारी जाहीर केली.
घाटीला या ७ निकषांवर १०/१० गुण
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अधिकाधिक वापर, वाढता रुग्ण खाटा 111 व्याप्ती दर, रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली, पदव्युत्तर जागांचा व विषयांचा विस्तार, अतिविशेषोपचार सेवांची व्याप्ती, क्ष-किरण तपासण्यांचा प्रतीक्षा कालावधी आणि पॅथॉलॉजी चाचण्यांची उपलब्धता यात पैकीच्या पैकी गुण घेतले. तर डेथ ऑडिट, एनएबीएल प्रयोगशाळेच्या मानांकनात ४ गुण आणि झिरो ड्रग पॉलिसीत ६ गुण मिळाल्याचे अहवालात नमूद आहे.