

Terrorist Khilji's brother arrested
मध्यप्रदेशातील खंडवा येथे महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिमी (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) संघटनेशी संबंधित कुटुंबातील चार तरुणांना चौकशीसाठी मंगळवारी (दि. २) रात्री ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर तिघांना सोडले. यात सिमीचा स्थानिक प्रमुख आणि भोपाल जेलब्रेक प्रकरणातील चकमकीत ठार झालेल्या अकील खिलजीचा मुलगा जलील खिलजी (३४, रा. गुलमोहर कॉलनी, खंडवा) कडे पिस्तूल आढळून आल्याने त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली.
तो २०१२ साली छत्रपती संभाजीनगरातील हिमायतबाग येथे झालेल्या एन्काउंटरमधील दहशतवादी अखिल खिलजीचा भाऊ असल्याचे सूत्रांनी सांगितले. जलील खिलजीच्या ताब्यातून पोलिसांनी देशी पिस्तूल, एक मॅगझिन व सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध खंडव्याच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जलील खिलजी हा सिमी संघटनेशी संबंधित असल्याने त्याच्यावर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून होत्या. तो येत्या सण उत्सवात मोठा घातपात करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाल्याने एटीएसने खंडवा येथील पोलिसांना माहिती देऊन कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर संभाजीनगर येथील एक एटीएसचे पथकही तेथे गेले होते, अशी माहिती मिळत आहे. जलील खिलजीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल आढळून आले. त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याचे जुने रेकॉर्ड व नेटवर्क तपासले जात आहे.
२६ मार्च २०१२ रोजी शहरात आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांना पकडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचून थोपविले होते. चोहोबाजूनी कोंडी झाल्याने दहशतवाद्यांनी एटीएसवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यात एक पोलिस गोळी लागून जखमी झाला होता. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अतिरेकी अझहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला, तर महंमद शाकेर उर्फ खलील खिलजी याच्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाला. यावेळी पाठलाग करून एटीएसने अतिरेकी अबरार ऊर्फ मुन्ना अब्दुल बाबूखान (रा. इंदौर) यास पकडले होते. यानंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. इंदौर, मध्यप्रदेश) याला बेड्या ठोकल्या होत्या. कारवाईत ४ गावठी कट्टे, २ पिस्तूल, १७ जिवंत काडतुसे जप्त केली होती.