

Sambhajinagar News: 193 polling booths for wards 6, 12, 13, and 14
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोन क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या चार प्रभागांसाठीची मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. प्रभाग ६, १२, १३, १४ साठी १९३ मतदान बूथ नेमण्यात आले असून, या चारही प्रभागांमध्ये एकूण ११ बीयू (बॅलेट युनिट्स) वापरण्यात येणार आहे. तर या चारही प्रभागांसाठी १२०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी अप्पर तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेव ारी रोजी मतदान घेतले जाणार असून, प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. मनपासाठीच्या प्रचाराच्या तोफा १३ जा-नेवारी रोजी सांयकाळी ५ वाजता थंडावणार असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततामय व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडेकोट नियोजन करण्यात आले आहे.
यात झोन क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या प्रभाग ६ मध्ये ३, प्रभाग १२ साठी २, १३ साठी ३ व १४ साठी ३ असे ११ बीयू युनिट्स लागणार आहेत. या चार प्रभागांतील निवडणुक प्रक्रिया चोखपणे राबण्यासाठी सुमारे १२०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मतदान अधिकारी, सहाय्यक कर्मचारी, पोलिस बंदोबस्त, क्षेत्रीय अधिकारी व निरीक्षकांचा समावेश आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिला मतदारांसाठी सुलभ व सुरक्षित मतदानाचा अनुभव मिळावा यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक निर्णय कार्यालयाकडून सर्व मतदान केंद्रांची पाहणी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानासाठीच्या ईव्हीएम, बीयू व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था काटेकोरपणे राबवली जात आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेद-नशील व अतिसंवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
सीसीटीव्ही देखरेख, फिरते पथक व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रभाग ६, १२, १३ व १४ मधील राजकीय वातावरण तापलेले असताना १५ तारखेला होणारे मतदान अनेक उमेदवारांच्या भवितव्याचे ठरणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशासन सतर्क, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रशासन सतर्क असून, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.