

Sambhajinagar News: Finally, Vijayanagar receives water after twenty-five years
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शब्दांपेक्षा कामावर विश्वास जनतेच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणारा विकास अशी भावना रविवारी (दि.११) विजयनगरवासीयांनी व्यक्त केली असून, तब्बल २५ वर्षांपासून भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आज अखेर सुटली. यासाठी मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २७ चे भाजप उमेदवार राजू वैद्य व गोविंद केंद्रे यांच्या अथक प्रयत्नाना यश आले.
गेल्या पंचवीस वर्षांपासून विजयनगर वसाहतीतील नागरिक पाण्यापासून वंचित होते. पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी प्रभाग २७ चे भाजप उमेदवार राजू वैद्य आणि गोविंद केंद्रे यांनी मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण पाठपुरावा, नियोजनबद्ध प्रयत्न आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधत वेळोवेळी पाठपुरावा केला.
दीर्घकाळापासून प्रतिक्षित असलेला पाण-प्रिश्न अखेर रविवारी कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर विजयनगरवासीयांना पाणी मिळाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. हा प्रश्न सुटताच विजयनगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
संपूर्ण वसाहतीतील गल्ल्यांमध्ये गृहिणींनी रांगोळ्या काढून आनंद व्यक्त केला. महिलांनी मंत्री अतुल सावे, राजू वैद्य व गोविंद केंद्रे यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषात जंगी सत्कार करण्यात आला. नागरिकांनी पाण्यासाठीचा लढा अखेर जिंकला, अशा भावना व्यक्त करत समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना राजू वैद्य यांनी या कामासाठी मार्गदर्शन व पाठबळ दिल्याबद्दल मंत्री सावे यांचे आभार मानले. तसेच मनपा प्रशासक जी. श्रीकांत, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी किरण धांडे, महेश चौधरी यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
नागरिकांच्या संयमामुळे व प्रशासनाच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी प्रभाग २७ चे भाजप उमेदवार राजू वैद्य, उमेदवार कैलास गायकवाड, उमेदवार, डॉ. सुनीता सोळुंके, उमेदवार दयाताई गायकवाड यांच्यासह प्रवीण जाधव, डॉ. अण्णासाहेब चेन्ने, संदीपान भारती, डॉ. संजय गंडे, राम केकाण, स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.