

छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या हजेरी अॅपवर उपस्थितीची नोंद न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वेतनकपातीला सामोरे जावे लागणार असून हजेरी अॅपचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी विनाकारण हजेरी नोंदविली नसलेल्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले. यापुढेही हजेरी अॅपवर उपस्थिती नोंदविली नाही, तर वेतनकपात करण्याबाबत स्वतंत्र परिपत्रक काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
महापालिकेच्या सेवेत सहा हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी आहेत. या सर्वांची दैनंदिन उपस्थिती हजेरी अॅपवर नोंदविली जाते. मात्र सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ५,५०० कर्मचाऱ्यांनी उपस्थिती नोंदविल्याचे आयुक्तांच्या आढाव्यात स्पष्ट झाले.
उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी काही जण दुसऱ्या शिफ्टमध्ये कार्यरत असल्याने त्यांची हजेरी नंतर नोंदविली जाणार होती. मात्र, दुसऱ्या शिफ्टमधील कर्मचारी वगळून अन्य कोणाची हजेरी नोंदलेली नाही, याची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी हजेरी अॅपवरील विभागप्रमुखांना दिले.
दरम्यान हजेरी अॅपव नोंदींच्या आधारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती निश्चित करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यापुढे हजेरी नोंदविण्यात कसूर करणाऱ्यांचे वेतन कपात करण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढण्याची सूचनाही आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे हजेरी अॅपवरील नोंदी अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी आता कर्मचारी आणि संबंधित विभागप्रमुखांवर राहणार आहे.
दरम्यान, हजेरी नोंदविली नसलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयात बोलाविण्यात आले होते. त्यापैकी २०० कर्मचारी उपस्थित राहिले. या कर्मचाऱ्यांबाबत संबंधित विभागांकडून माहिती मागविण्यात आली. माहिती संकलित केल्यानंतर हजेरी नोंदविली नसण्यामागे कोणतेही ठोस कारण नसलेल्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.
रजा, निवृत्तीच्या नोंदीही अपूर्ण
हजेरी अॅपवर उपस्थिती न दिसण्यामागे काही कर्मचाऱ्यांची रजा, तर काहींची निवृत्ती ही कारणे असल्याचे आढाव्यात समोर आले. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी अॅपवर रजेची नोंद केलेली नव्हती. तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची माहितीही अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रजेच्या नोंदी पूर्ण करण्यासह निवृत्त कर्मचाऱ्यांचा डेटा अद्ययावत करण्याच्या सूचना आयुक्तांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.