

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील २२२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत घेण्यात आलेली परीक्षा आणि निवड प्रक्रियेवर एमआयएमने गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्तेनुसार प्रथम आलेल्या उमेदवारांची पुन्हा घेतलेली परीक्षा आणि अपात्र ठरविण्याचे निकष याबाबत प्रश्न उपस्थित करत संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते समीर साजिद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत नियुक्त्या देऊ नयेत, अशी मागणीही करण्यात आली.
महापालिकेतील विविध ११ संवर्गातील २२२ पदांच्या भरतीप्रक्रियेवर आक्षेप घेत शुक्रवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते समीर साजिद, नगरसेवक ओसामा कदीर मौलाना यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली. यावेळी भरती प्रक्रियेवर सुमारे तासभर चर्चा करण्यात आली. तसेच भरती प्रक्रियेसाठी मनपाने २५ मार्च २०२६ रोजी आयबीपीएससोबत करार केला होता. या प्रक्रियेशी संबंधित सर्व कागदपत्रांच्या प्रती देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
परीक्षा केंद्रांवर ४० ते ५० उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात फॉर्म क्रमांक १, २ आणि ए भरण्याच्या प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेची माहिती मागविण्यात आली. विशेष म्हणजे, २०० पैकी १८० गुण मिळवून प्रथम आलेल्या दोन उमेदवारांसह ४२ उमेदवारांची फेरपरीक्षा कोणत्या नियमाखाली घेण्यात आली, असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला. प्रत्येक केंद्रावर मनपाचे अधिकारी तैनात असतानाही गैरप्रकार कसे घडले, याची चौकशी करून परीक्षा केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, आयबीपीएससोबतच्या करारातील कलम १.१२ नुसार निकाल एकदाच जाहीर करण्याची तरतूद आहे, तर कलम ३.१ नुसार तांत्रिक बिघाड किंवा परीक्षेत व्यत्यय आल्यासच फेरपरीक्षेची तरतूद असल्याचा दावा शिष्टमंडळाने केला. त्यामुळे ४२ उमेदवारांची फेरपरीक्षा नेमक्या कोणत्या तरतुदीनुसार घेण्यात आली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली.