

छत्रपती संभाजीनगर : शहरात भूमाफियांनी गुंठेवारी कायद्याचा गैरवापर सुरू केला आहे. जागा यलो झोनमध्ये असतांना एनए न करता एकरच्या एकर जागा गुंठेवारीअंतर्गत अधिकृत करण्याचा सपाटा सुरू आहे. हसूल भागात अनेक अनधिकृत गुंठेवारीचे प्रस्ताव मंजूर झाल्याची खळबळजनक माहिती माजी उपमहापौर विजय औताडे यांनी सर्वसाधारण सभेत गट नंबरसह दिली. त्यामुळे शहरात असे गैरप्रकार नेमके किती ठिकाणी झाले असून महापालिका या घोटाळ्याला लगाम लावणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेत महापौरपदी विराजमान होताच समीर राजूरकर यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ससह भ्रष्टाचारमुक्त प्रशासन करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईचे आदेशही दिले होते. त्यानुसार शहरात आठवडाभर कारवाई सुरू राहिली. या मोहीमेत मनपाच्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा पोस्टर काढतांना वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
यामुळे महापालिका प्रशासनाने विजेच्या खांबावर पोस्टर, बॅनर लवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शहरात काही प्रमाणात वीजेच्या खांबांवर अनधिकृत पोस्टर, बॅनर लागने कमी झाले आहेत. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याबाबत महापौरांनी जाहीर केले.
दरम्यान, प्रत्यक्षात कामकाजातील गैरप्रकार पुढे आल्यानंतरही त्यात कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. सोमवारी (दि. २०) महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यात सत्ताधारी पक्षाचे माजी उपमहापौर विजय औताडे यांनी गुंठेवारी विभागाच्या कामकाजाची चिरफाड केली. गुंठेवारीअंतर्गत मालमत्ता नियमित करण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा ठराव सभेत प्रशासनाकडून मांडण्यात आला होता. त्या ठरावावर बोलताना औताडे यांनी हसूलमध्ये २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांत निमयबाह्यरीत्या गुंठेवारीचे प्रस्ताव मंजूर केले.
जागा यलो झोनमध्ये असताना एनए न करताच तुकडे पाडून विक्री केले. विशेष म्हणजे एकाच मालकी हक्क असलेल्या मालमत्ताधारकाने ही विक्री केल्याचे स्पष्ट दिसत असतानाही गुंठेवारीत झाली. त्यामुळे नगररचना आणि गुंठेवारी विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शासनाचा शुल्क बुडविला
हर्सल भागात यलो झोनमधील जागा गुंठेवारी कायद्यांतर्गत अधिकृत केल्या आहेत. गुंठेवारीच अनधिकृत पद्धतीने झाली असून तुकडे बंदी असताना महापालिकेने या जागा अधिकृत केल्या. यामुळे एनएसह इतर शासकीय शुल्कावर पाणी फेरले गेले आहे.
दोन वर्षांत सर्वाधिक गैरप्रकार
शहरातील हर्मूल भागातच दोन वर्षांत सुमारे ५० एकरहून अधिक जागा गुंठेवारीअंतर्गत अधिकृत झाल्याचा दावा, माजी उपमहापौर विजय औताडे यांनी केला आहे. यात एकाच मालकी हक्काच्या जागांच सर्वाधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. हा व्यवहार मागील दोन वर्षांतील असल्याचेही ते म्हणाले. याबाबत माहिती आयुक्तांना सादर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.