

Sambhajinagar Encroachment Campaign start again from Harsool
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सोमवार (दि.२८) पासून हाती घेण्यात येणार आहे. महापालिकेकडून हसूलपासून पाडपाडीला सुरुवात होणार असून, गेल्या काही दिवसांपूर्वी मार्किंग करण्यात आलेले सात रस्ते अतिक्रमणमुक्त केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेने शहरात जून महिन्यापासून रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात बीड बायपास रोडवर सर्व्हिस रोडसाठी बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर मुकुंदवाडी येथील खुनाच्या घटनेनंतर महापालिकेने पोलिसांना सोबत घेऊन येथील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला.
दुसऱ्या टप्प्यात केंब्रीज चौकापर्यंतचा दोन्ही बाजूंचा जालना रोडवरील सर्व्हिस रोड मोकळा केला. त्यानंतर पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा, दिल्लीगेट ते हसूल टी पॉइंट, हसूल टी पॉइंट ते सिडको बसस्थानक, रेल्वेस्टेशन ते महावीर चौक अशी कारवाई करण्यात आली. मात्र जालना रोडवरील सेव्हनहिलपर्यंत कारवाई करून अतिक्रमण विभागाने मोहीम गुडांळली. दरम्यान शहर विकास आराखड्यातील रस्त्यांवर मार्किंग करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.
त्यामुळे गेल्या काही दिवसांत आठ रस्त्यांवर मार्किंग करण्यात आली. मनपाच्या नगर रचना विभागाने ज्या रस्त्यावर मार्किंग केले, तेथील मालमत्ताधारकांनी स्वतः होऊन रस्त्याला बाधित होत असलेला भाग काढून घेत आहेत. मात्र सोमवारपासून आता पुन्हा एकदा पाडापाडीला सुरुवात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार हर्मूलमधून तिसऱ्या टप्प्याची मोहीम सुरू केली जाणार आहे. हसूल टी पॉइंट ते समृद्धी पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता ६० मीटर रुंदीचा केला जाणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांत महापालिकेने सात रस्त्यांवर मार्किंग केली असून, या रस्त्यांवर टप्प्या-टप्प्याने पाडापाडी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हसूल टी पॉइंट ते समृद्धी पेट्रोलपंप : १०० मीटर
नारेगाव रोड : ३० मीटर रुंद
सेवनहिल ते सूतगिरणी चौक : ३० मीटर
सूतगिरणी चौक ते शहानूरमिया दर्गा चौक : २४ मीटर
भाजीवाली बाई चौक ते आनंद गाडे चौक : २४ मीटर
महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ते मिल कॉर्नर : ३५ मीटर
कॅन्सर हॉस्पिटल ते दिल्लीगेट : ३५ मीटर