

वैजापूर : पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादातून संतप्त प्रियकराने थेट प्रेयसीचा खून करत तिचा मृतदेह दौलताबाद घाटात फेकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २४) रात्री घडली. आरोपीने शुक्रवारी सकाळी शिऊर पोलीस ठाण्यात हजर होत खुनाची कबुली दिल्याने सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेने दौलताबाद आणि वैजापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवतीचे नाव दिपाली गणेश आस्वार (वय १९, रा. माळीवाडा, ता. कन्नड) असे आहे. ती कन्नड येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होती. गेल्या काही महिन्यांपासून तिचे मांडकी (ता. वैजापूर ) येथील सुनील सुरेश खंडागळे (वय २१) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. गुरुवारी (दि.२४) सुनील कन्नडला जाऊन दिपालीला भेटला. त्यानंतर ते दोघे दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. रात्री दौलताबाद घाटात त्यांच्यात तीव्र वाद झाला. वादाचे कारणही गंभीर होते. दिपालीने सुनीलकडे एक लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास "बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन" अशी धमकी दिली.
या धमकीने संतप्त झालेल्या सुनीलने आपले भान हरपून रागाच्या भरात दिपालीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला आणि तिचा मृतदेह घाटात ढकलून दिला. ही घटना घडल्यानंतर काही तासांतच सुनील शुद्धीवर आला आणि थेट शिऊर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंब यांनी तत्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता काही वेळातच तो आढळून आला. नंतर ओळख पटवून मृतदेह दिपाली आस्वार हिचा असल्याची खात्री करण्यात आली.
दरम्यान, आरोपीला शिऊर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत.