

Sambhajinagar Encroachment Campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेने जालना रोडवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. यात बाबा पंप ते सेव्हनहिल ४५ मीटर रुंदीचा तर सेव्हनहिल ते केंब्रीज चौका ६० मीटर रुंदीचा असून त्यादरम्यान येणारी सर्व अतिक्रमणे काढली जाणार आहेत.
यात काही कंपन्यांसह पंचतारांकित हॉटेल रामा, अजंता अॅम्बेसेडर, लेमनट्री, जिमखाना क्लब आणि धूत हॉस्पिटलची संरक्षक भिंतदेखील पाडली जाईल, असे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी जाहीर केले होते. मात्र, ही सर्व बांधकामे परवानगी घेऊनच झाली आहे, ६० मीटर रुंदीचा निर्णय त्यानंतरचा असल्याचे एमआयडीसीने सांगितल्याने बड्यांची अतिक्रमणे जैसे थेच राहणार आहेत.
महापालिकेने शहराचे पाच प्रवेशद्वार सुसज्ज ६० मीटर रुंदीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बाबा पेट्रोल पंप ते केंब्रीज चौक, छावणी ते दौलताबाद टी पॉइंट, महानुभव आश्रम ते नक्षत्रवाडी, महानुभव आश्रम ते झाल्टा फाटा, सिडको बसस्थानक ते हसूल गाव या रस्त्यांचा समावेश आहे.
या मार्गावर मुख्य रस्त्याशिवाय दोन्ही बाजूने १२-१२ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड तयार केले जाणार आहे. या कामासाठी महापालिकेने पाडापाडी सुरू केली आहे. शहर विकास आर-ाखड्यानुसार हे रस्ते असून त्यासाठी न्यायालयानेदेखील महापालिकेला कारवाईचे आदेश दिले आहेत. यात बांधकाम परवानगी घेऊन जर मालमत्ताधारकांनी स्वतःच्या जागेत बांधकाम केले असेल तर त्यांना पाडापाडीतून वगळले जाणार आहे. परंतु, ज्यांनी स्वतःच्या जागेमध्ये परवानगी न घेता बांधकाम केले असेल ते या मोहिमेत पाडले जाणार आहे.
दरम्यान, प्रशासक जी. श्रीकांत यांनी सेव्हनहिल ते केंब्रीज चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडसाठी जागा रखीव आहे. ही जागा महापालिकेच्या मालिकची आहे, असे सांगितले होते. शुक्रवारी प्रशासकांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावून घेतले. एमआयडीसीच्या जागेतील सर्व्हस रोडची माहिती घेतले. त्यात त्यांनी एमआयडीसीकडून त्यांचा प्लॅन जाणून घेतला. एमआयडीसीच्या जागेतून सर्व्हिस रोड नसल्याचे सांगितले.