

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
मुकुंदवाडी, संजयनगर येथील अतिक्रमणावरील कारवाईनंतर महापालिकेकडून शनिवारी (दि. २८) सकाळी केंब्रीज ते चिकलठाणा मुख्य रोडवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. यात जवळपास सर्वच व्यावसायिक मालमत्तांचा समावेश असून या रोडवरील १५ ते २० हॉटेलसह विविध दुकाने पाडण्यात आली. या हॉटेल, दुकानांमधील सुमारे सहा हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून आता त्यांच्यापुढे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे.
क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून मुकुंदवाडी येथे तिघांवर सुर्याने वार करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत एका जणांचा जीव गेला. या हत्येच्या घटनेनंतर पोलिस व महापालिकेकडून मुकुंदवाडी मुख्य रोडवरील दुकानांसह हॉटेल, गॅरेज व विविध प्रकारची दुकाने पाडण्यात आली.
यात हातावर पोट असलेल्या सुमारे तीन ते चार हजार जणांचा रोजगार हिरावला गेला. त्यानंतर महापालिकेने शनिवारी केंब्रिज ते चिकलठाणा मुख्य रोडवरील सुमारे ४९० अतिक्रमणे जमीनदोस्त केली. यात सर्वाधिक व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. यात चिकलठाणा बजार तळासमोरील असलेली सुमारे वीस हॉटेल व विविध प्रकारची दुकाने पाडण्यात आली.
तसेच केंब्रीज चौकापासून ते चिकलठाणा रोडवरील हॉटेल्स. रेस्टारंट व फुले, झाडांची विक्री करणाऱ्या नर्सरीसह किराणा दुकान, बेकरी व विविध प्रकारची दुकाने भुईसपाट करण्यात आली. त्यामुळे सुमारे सहा हजार कामगार बेरोजगार झाले आहेत.
चिकलठाणा भागात संजय जैस्वाल यांची रोडलगत सुमारे दीडशे दुकाने होती. ही दुकाने त्यांनी भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र कारवाईत सर्वच दुकाने भूईसपाट झाली आहे. हेच बांधकाम जर परवानगी घेऊन केले असते तर वाचले असते. नसता गुंठेवारी केली असती तरी दुकाने वाचली असती.
महापालिकेच्या शेकडो दुकाने, हॉटेल्स भुईसपाट झाली. यात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ६ हजार कामगारांवर बेरोजगारांची कुऱ्हाड को-सळली. आता पोटाची खळगी कशी भरायची, अशी चिंता त्यांच्यापुढे निर्माण झाली आहे.