

Chhatrapati Sambhajinagar Encroachment Removal Campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चारशे पोलिसांचा फौजफाटा, साडेतीनशे मनपा कर्मचारी, २० जेसीबी, १५ हायवा, सोबतच अॅम्बुलन्स, अग्नीशमन बंब, पोलिसांच्या गाड्या अन दंगाकाबू पथक घेऊन सकाळी १० वाजता प्रशासनाचा लवाजमा जालना रोडवरील केंब्रीज चौकात दाखल झाला...
त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सुरू करण्यात आलेल्या शहरासाठी अभूतपूर्व अशा अतिक्रमण हटाव मोहिमेने अतिक्रमणधारक हादरले... पाहता पाहता सायंकाळपर्यंत मोठमोठ्या इमारती, हॉटेल्स, दुकाने, व्यापारी संकुले अशा तब्बल ४९० मालमत्ता भुईसपाट करण्यात आल्या. एखाद्या मोठ्या भूकंपानंतर जसे चित्र दिसते अगदी तीच परिस्थिती या कारवाईनंतर चिकलठाणा ते केंब्रीज या दोन किलोमीटर अंतरावर दिसून आली. जिकडेतिकडे धुळीचे लोट आणि सिमेंट-विटांचे ढिगारे दिसत होते. शहराच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वांत मोठी अतिक्रमण हटाव मोहीम समजली जात आहे...
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने २० जून रोजी शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडवरील मुकुंदवाडी ते चिकलठाणादरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. एकाच दिवसात पथकाने येथील लहानमोठ्या २२९ अतिक्रमणांवर बुलडोजर चालवून जमीनदोस्त केले होते. त्यानंतर काही मालमत्ताधारकांनी कारवाईविरोधात खंडपीठात धाव घेतली होती.
यात खंडपीठाने कारबाईला स्थगिती न देता उलट महापालिका धडक मोहीम राबवण्याचे व शहरातील सर्व प्रमुख व विकास आराखड्यातील मंजूर रस्ते रुंद करण्याचे आदेश दिले. तसेच मालमत्ताधारकांना दोन दिवसांत स्वतः हून अतिक्रमणे काढून घेण्यासाठी वेळ दिली होती.
हा अवधी संपल्यानंतर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागप्रमुख अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या नेतृत्वात पथक शनिवारी (दि. २८) सकाळी ९,३० वाजताच जालना रोडवर दाखल झाले. पथक १० वाजता चिकलठाण्यात धडकले. त्यानंतर अ, ब, क, ड आणि ई असे पाच पथक तयार केले.
दरम्यान, महापालिकेचे पथक केंब्रीज शाळेजवळील चौकात दाखल झाले. येथील मैदानात कारवाईचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर पाच पथकापैकी मुकुंदवाडीकडून केंब्रीज शाळेकडे जाणाऱ्या जालना रोडच्या उजव्या बाजूच्या कारवाईसाठी तीन पथके तर जालना रोडच्या डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी दोन पथके तैनात करून सकाळी ११ वाजेपासून कलश हॉटेलपासून कारवाईला सुरू केली.
यावेळी पथकात २० जेसीबी, ५ पोकलेनसह मनपा आणि पोलिसांचा फौजफाटा पाहून या रस्त्यावरील अनेकांच्या मनात धडकी भरली. जालना रोडच्या दोन्हीही बाजूने असलेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली. यात हॉटेल्स, दवाखाने, दुकानांच्या पक्क्या बांधकामांचा समावेश होता. त्याशिवाय दुकानांच्या समोरचे शेडस्, टपऱ्या, ओटे यासह सर्वच प्रकारचे अतिक्रमण काढण्यात आले.
केंद्रीज चौक येथून अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेला सुरूवात झाली. यावेळी दोन हॉटेल व्यवसायिकांनी कारवाईला विरोध करीत आम्ही स्वतः पाडापाडी करुन घेतो, असे सांगितले. तेव्हा काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, आता दिलेली मुदत संपली आहे, असे सांगत अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी हात जोडून कारवाई करु द्या, अशी विनंती केली. तेथून पुढे पथक हिनानगर येथे येताच व्यवसायिकांनी पथकाला विरोध करीत मार्किंगची मागणी केली. त्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेने दोन उपायुक्तांनी व्यवसायिकांना कारवाईचा दम देताच विरोध मावळला. त्यानंतर पाडापाडी सुरू केली.
या मोहिमेसाठी ५ पथक तयार केले होते. यात एका पथकात २ सहायक आयुक्त, २ इमारत निरीक्षक, २५ नागरी मित्र पथकाचे माजी सैनिक, १० कंत्राटी कर्मचारी, नगर रचना विभागाचे १५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पाच पथकांमध्ये सुमारे ४०० पोलिस आणि ३५० महापालिका कर्मचारी असा एकूण ७५० जणांचा फौजफाटा मोहिमेत सहभागी होता. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
महापालिका कर्मचारी ३५०
पोलिस कर्मचारी ४००
माजी सैनिक १५०
जेसीबी २०
पोकलेन 4
हायवा ट्रक १५
मिनी ट्रक ५
कोंडवाडा २
इलेक्ट्रिक हायड्रोलिक वाहन ४
अॅम्ब्युलेन्स २
अग्निशमन बंब २