

छत्रपती संभाजीनगर : दरोड्यात लुटलेले सोने विकून अमोल खोतकरने दिलेल्या पैशातून त्याची बहीण रोहिणीने पडेगावात 9 लाखांचा प्लॉट खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. ही रक्कम गुन्हे शाखेने जप्त केली आहे. दरम्यान तिची शुक्रवारी (दि.27) हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. अटकेपूर्वी ती गोव्याला गेली होती. त्यामुळे तिच्या मित्रालाही शहरात आणले असून, त्याचीही कसून चौकशी सुरू आहे.
अधिक माहितीनुसार, बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यात पाच साथीदारांच्या मदतीने कुख्यात गुन्हेगार अमोल खोतकरने दरोडा टाकून 15 मेच्या रात्री साडेपाच किलो सोने आणि 32 किलो चांदीसह कोट्यवधींचा ऐवज लुटून नेला होता. दरोडा टाकल्यानंतर तो नांदेडमार्गे तिरुपती गेला होता. नांदेडमध्ये त्याने सोने विक्री केले होते. त्यानंतर तो पुन्हा शहरात आला होता. त्याने बहिणीकडे नांदेड येथून आणलेले पैसे दिले होते.
या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी रोहिणीने पडेगावात 9 लाखांत एक प्लॉट खरेदी केला होता. तिने पैसे देऊन 24 मे रोजी इसापावतीही केली होती. मात्र साजापूर रस्त्यावर 26 मे रोजी तिचा भाऊ अमोल हा एन्काउंटरमध्ये मारल्या गेला. त्यानंतर तिने 220 तोळे सोन्याचे दागिने आणि पिस्तुलाची काडतुसे ही तुळशी वृंदावनात मातीमध्ये गाडून ठेवली.
पोलिसांकडून चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्यानंतर तिला अटकेची भीती होती. त्यामुळे तिने 30 किलो चांदीही कारच्या डिक्कीत असल्याची माहिती चौकशीत दिली होती. ती जप्त केल्यानंतर प्लॉटबाबतही पोलिसांना माहिती पडेल म्हणून तिने काही दिवसांपूर्वी प्लॉटच्या मालकाला पैसे परत करून इसारपावती रद्द करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मात्र 23 जूनला रोहिणीला अटक झाल्यानंतर तिच्याकडून पोलिसांनी मातीत गाडलेले दागिने, काडतुसे हस्तगत केली. त्यानंतर प्लॉटची माहिती मिळाल्याने संबंधित मालकाकडून 9 लाख रुपये जप्त करण्यात आले.
रोहिणी 18 जूनला मोबाईल बंद करून दोन दिवस गोव्याला गेल्याचे समोर आले होते. तिथे तिचा मित्र रणजितसोबत ती होती. त्याच्याकडे तिने पैसे अथवा सोने दिले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने रणजितला गोव्याहून आणले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. एक पथक पुन्हा गोव्याला तपासासाठी जाणार आहे.