

Abusing Municipal Corporation officials; Case registered against 18 people
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीगेट येथील अतिक्रमण पाडण्यासाठी गेलेल्या मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या १८ ते १९ जणांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात सोमवारी (दि.७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डी लाईट ज्यूस सेंटरचा मालक, रियाज, जुबेर जहीर बागवान, रफिकचा मुलगा तसेच १२ ते १५ इसम अशी आरोपींची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
मुकुंदवाडीत खुनाच्या घटनेनंतर पोलिस आणि मनपा प्रशासनाने शहरातील अतिक्रमणावर बुलडोजर कारवाई सुरू केली. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पोलिसांनी संवेदनशीलपणे हाताळून जालना रोड, दिल्लीगेट, पडेगाव येथील अतिक्रमणे भुईसपाट केली. हा बुलडोजर पॅटर्न राज्यभरात चर्चेत आला.
अतिक्रमणावर कारवाई करताना मोठा विरोध असतो हे आजवरच्या घटनांवरून समोर आले आहे. मात्र अख्खे शहर पोलिस कारवाईत पुढे उभे ठाकल्याने फारसा विरोध झाला नव्हता. मात्र दिल्लीगेट येथे सोमवारी (दि.७) सकाळी नागरिक आणि पोलिस, मनपा पथकासोबत टोळके धावून गेले. शिवीगाळ, दगडफेक करून धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अडथळा आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यांवर रियाज हा दगड घेऊन धावून गेला. त्यावरून मनपाचे प्रभारी सहायक आयुक्त फिर्यादी संजय सुरडकर यांच्या तक्रारीवरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिल्लीगेट येथे कारवाईला विरोध झाल्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांनी डीसीपी पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, एसीपी संपत शिंदे यांना तात्कळ कडक कारवाईच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, निर्मला परदेशी, संग्राम ताठे हेही अतिक्रमणाच्या ठिकाणी स्वतः उभे ठाकले होते. दंगा काबू पथक, एसअ- ारपीएफच्या तुकड्या, सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर उतरला होता. अश्रू धुरांच्या नळकांड्याही सोबत बाळगून होते.
नवनियुक्त डीसीपी पंकज अतुलकर यांना अतिक्रमण हटाव कारवाईच्या ठिकाणी क्यूआरटीच्या सशस्त्र सहा कमांडोसह दोन अंमलदारांचे सुरक्षा कवच घेरा घालून होते. डीसीपी पंकज अतुलकर पुढे जाताना कमांडो समोरील गर्दी हटवत, रस्ता मोकळा करत पुढे नेत होते. त्यामुळे हा सीन पाहणाऱ्यांना पोलिसी कारवाईपेक्षा एखाद्या व्हीआयपी ममुव्हमेंटफ्चा अनुभव आल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी मात्र कोणतीही खास सुरक्षा न घेता, थेट नागरिकांमध्ये उतरून सूचना देताना दिसले.
शहरातील अतिक्रमणावर बुलडोजर कारवाई सुरू असून, संभाजीनगर पॅटर्नची राज्यभरात चर्चा आहे. नाशिक येथेही कुंभमेळ्याच्या धर्तीवर हा पॅटर्न राबविण्याचा विचार तेथील प्रशासन करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.