

Jayakwadi Dam filled to 55 percent
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. नाशिक परिसरात सतत मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावरी नदीचे पात्र दुधडी भरून वाहत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा ५४.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या वरच्या भागातून जायकवाडीत तब्बल ४२ हजार २२३ क्युसेक प्रतिसेकंद या प्रमाणात पाणी दाखल होत आहे.
मराठवाड्यात आतापर्यंत पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे विभागातील बहुतेक धरणे रिकामीच आहेत. दुसरीकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात नाशिक जिल्ह्यात सतत दमदार पाऊस होतो आहे. त्याचा फायदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढण्यास होत आहे.
२० जून रोजी जायकवाडी धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावरी नदीचे पात्र भरून वाहत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. सोमवारी जायकवाडीतील उपयुक्त साठा ५४.४५ टक्क्यांवर पोहोचला. २० जूनपासून ६ जुलैपर्यंत जायकवाडी धरणात तब्बल २६ टक्के पाणी दाखल झाले आहे.
त्यात सोमवारी पाण्याची आवक आणखीन वाढली आहे. नागमठाण येथून जायकवाडी धरणाच्या दिशेने ४२ हजार २२३ क्युसेक पाणी येत आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार १७२ क्युसेक इतका विसर्ग करण्यात येतो आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांत जायकवाडीच्या उपयुक्त साठ्यात आणखी वाढ होणार आहे. उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील दारणा, गंगापूर, कडवा, नांदूर मधमेश्वर बंधारा, देवगड आणि नागमठाणा या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.