

Sambhajinagar Encroachment Campaign Marking work of ten roads completed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील दहा प्रमुख रस्त्यांच्या मार्किंगचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा सविस्तर अहवाल लवकरच सादर होणार आहे. त्यानंतर या रस्त्यांमध्ये येणारी अतिक्रमणे निष्काशित करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी (दि.२३) दिली.
महानगरपालिकेने शहरात मागील काही दिवसांपासून रस्ते रुंदीकरणाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत रस्त्यांवरील हजारो अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेही आपल्या कार्यक्षेत्रातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्राधिकरणाच्या हद्दीतील दहा प्रमुख रस्त्यांवरील मार्किंग करण्याच्या सूचना प्राधिकरणाचे महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या.
त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जागतिक बँक प्रकल्प, एमआयडीसी आणि इतर यंत्रणांकडून हे काम सुरू होते. आता हे काम पूर्ण झाल्याची माहिती पापळकर यांनी बुधवारी दिली. त्यांनी सांगितले की, दहा रस्त्यांवरील मार्किंग पूर्ण झाली आहे.
त्यात नेमक्या किती मालमत्ता येणार याचा अहवाल लवकरच यंत्रणांकडून प्राप्त होईल. त्यानंतर रस्त्यात जी अतिक्रमे आहेत, ती निष्काशित केली जातील. तूर्तास रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादनाची कोणतीही कार्यवाही होणार नाही. केवळ जी बांधकामे रस्त्यासाठी आधीच संपादीत जमिनीत उभी आहेत, त्यावरच कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही कारवाईची वाट न पाहता ती स्वतः काढून घ्यावीत. तसेच बांधकामाबाबत भविष्यात होणारी फसवणूक व आर्थिक हानी टाळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन व बांधकाम परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ रस्ता
केम्ब्रीज शाळा ते करमाड गाव (जालना रोड)
बाळापूर गाव ते पांढरी गाव (धुळे-सोलापूर रस्ता व बीड बायपास)
गेवराई ते कौडगाव (पैठण रस्ता)
छावणी हद्द ते रहिमपूर (छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता)
ए. एस. क्लब चौक ते रांजणगाव पोळ (घोटी रस्ता)
करोडी ते पाचपीरवाडी (धुळे-सोलापूर रस्ता)
ओहर ते ममनापूर (जटवाडा रस्ता)
सावंगी तलाव ते बिल्डा (जळगाव रस्ता)
सावंगी ते केम्ब्रीज शाळा राज्य महामार्ग