

labor shortage in agriculture farmer in tention
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : निर्सगाच्या लहरीपणाला नेहमीच बळी पडत असलेला बळीराजाचा खरीप हंगाम जोरात सुरू असून, मजुरांच्या टंचाईमुळे चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड सिल्लोड, पैठणसह स्वच परिसरात यंदा ८० ते १०० रुपयांनी शेतमजुरी वाढली असूनही पुरेसे मजूर मिळत नाहीत. त्यामुळे आता आपण नाही तर मजूरच मालक झाला असल्याचे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.
खत, बी-बियाणे, औषधी यांचे दर आधीच वाढलेले आहेत, त्यात मजुरीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. वेळेवर मजूर मिळत नसल्याने काही भागांत शेतीची कामे थांबली आहेत. काम बंद पडल्याने उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. या सगळ्या संकटामुळे बळीराजाची अवस्था शेती करावी तरी कशी? अशी झाली आहे.
महिला बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लघुउद्योजकता, हस्तकला आणि शेळीपालन अशा योजना फळाला जात आहेत. मात्र यामुळे शेतकामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत शेतमजुरांना जिल्ह्यात एका दिवसाच्या मजुरीत ८० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पुरुषांना ३०० ते ३५० तर महिलांना २०० ते २५० मजुरी होती. यावर्षी मात्र पुरुषांना ३५० ते ४०० रुपये तर महिलांना ३०० ते ३५० रुपये एका दिवसाची मजुरी मिळत आहे.
शेतकरी संघटनांच्या मते, दरवर्षीप्रमाणे यंदाही मजुरीवरून वाद सुरू आहेत. शेतातील कामे होण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मजुरी द्यावी लागत आहे. तरीही मजुरांची संख्या पुरेशी नाही. आज घडीला मजुरी घेणारे शेतमजूर हतबल झाले नाहीत. तर मजुरी देणारे शेतकरीच हतबल झाल्याचे चित्र आहे.