

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारी झाल्याने पैशासाठी नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी (दि. २९) चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गेवराई शिवारात अलाना कंपनीसमोर करण्यात आली. बालसिंग करमसिंग टाक (४८, रा. ब्रुक बॉण्ड, अलाना गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४८० गोळ्या जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी दिली.
ग्रामीण दलाचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी नार्कोटिक्स विरोधात धडक कारवायांचे आदेश दिल्यापासून जिल्हाभरात नशेचा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजपूत यांना पैठण रोडवरील गेवराई शिवारात वस्तीमध्ये नशा करण्यासाठी एकजण गोळ्या विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार एपीआय संतोष मिसळे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी टाक याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अल्प्राझ ोलम नावाच्या ४८ स्ट्रीप असा एकूण ४८० गोळ्या मिळून आल्या. त्याला अटक करून चिकलठाणा पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, एपीआय संतोष मिसळे, जमादार सचिन सोनार, रवींद्र लोखंडे, अंगद तिडके, गोपाल पाटील, सिंही गोरे, सुरोशे, सरला जाधव, दुबिले, खरात, नीलेश कुडे, अन्न औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांनी केली.
स्वतःचे झाले ऑपरेशन, मुलगाही जेलमध्ये
सूत्रांच्या माहितीनुसार, टाक हा अगोदर भांडी तयार करण्याचे काम करायचा. मात्र, दारूच्या व्यसनामुळे मध्यंतरी त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया झालेली आहे. मुलगा गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये आहे. आर्थिक कोंडी होताच त्याने नशेच्या गोळ्यांची विक्री सुरू केली. ६० ते १०० रुपयाला एक गोळी तो विक्री करत होता.