

Sambhajinagar dead body found case registered
कन्नड, पुढारी वृत्तसेवा: शहरातील हिवरखेडा गौताळा रोडवरील शेतात १९ जुलै रोजी सापडलेल्या एका मृतदेह प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मित्रांनी अतिप्रमाणात दारू पाजून त्याचा घातपात केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्तिक राजू जाधव (२७), किशोर भारत जाधव (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. धारसिंग धरमू जाधव (३०, रा. हिवरखेडा गौ.) हा १९ जुलै रोजी गावाजवळील शेतात संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आला होता. ही बाब प्रथमदर्शनी अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला, असा अंदाज होता.
मात्र पोलिसांनी वेगळ्या दिशेने तपास केला असता तपासात असे निष्पन्न झाले की, धारसिंग यास कार्तिक जाधव, किशोर जाधव यांनी दुचाकीवरून गावाबाहेरील गौताळा अभयारण्यात नेले. तिथे त्याला जबरदस्तीने अत्याधिक प्रमाणात दारू पाजली. त्यानंतर धारसिंग याला त्रास होऊ लागला.
मात्र मदतीऐवजी ते त्याला तसेच सोडून पळून गेले, याबद्दल त्यांनी कुटुंबाला व पोलिस प्रशासनास माहिती दिली नाही. यामुळे शहर पोलिसांनी कार्तिक, किशोर या दोन्ही आरोपींना बुधवारी (ता.६) अटक करून त्यांना कन्नड दिवाणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करत आहेत.