

Raksha Bandhan festival ST Corporation provides additional buses
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शनिवारी रक्षाबंधन सण साजरा होत आहे. कामानिमित्त बाहेर जिल्ह्यात किंवा इतर राज्यांत असलेला किंवा शहरात असलेला भाऊ मूळ गावी जाऊन बहिणीकडून राखी बांधण्यासाठी गावी येतोच. त्यामुळे शुक्रवारी (दि.८) दोन्ही बसस्थानके बहिण-भावांसह प्रवाशांच्या गर्दीने फुलले होते.
या सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर विभागातून विविध मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. पुणे-१५, आकोला-३, नागपूर-२ आणि लातूर-३ अशा ३५ जादा बस सोडण्यात आल्या आहेत. हा सण साजरा केल्यानंतर परतीच्या मार्गावरही होणारी गर्दी लक्षात घेऊन ही सेवा दोन दिवस ठेवण्यात आली आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी मुख्य बसस्थानकांसह सिडको बसस्थानकांवर विविध मार्गावर प्रवास करण्यासाठी भावांसह बहिणींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बस येताच जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची एकच धडपड दिसून आली.
जळगाव - धुळे मार्गावरही जादा बस
वरील मार्गाप्रमाणेच जळगाव आणि धुळे मार्गावरही मोठ्या प्रमाणात या सणानिमित्त वाहतूक वाढत असते. यामुळे ऐनवेळी या मार्गावरही जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उत्पन्नावर फोकस
दोन दिवस चालणाऱ्या जादा बसमुळे जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबत वरिष्ठांनी चालक-वाहकांना सूचनासह मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे विविध मार्गावर धा-वणाऱ्या जादा बसमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर फोकस केला आहे.