

Jan Aakrosh march in city in support of homeless people
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अतिक्रमण कारवाई विरोधात बेघर व निर्वासित नागरिकांनी शुक्रवारी (दि.८) सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटनांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढला. गोरगरिबांची घरे, दुकाने उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावर आणले जात असताना श्रीमंतांच्या घरांना हात न लावल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला.
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला दुपारी १ वाजता सुरुवात झाली. डीजे, बॅनर, झेंडे घेऊन नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सिल्लेखाना-पैठणगेट-गुलमंडी-सिटी चौक-किल्लेअर्कमार्गे मोर्चा व्हीआयपी रोडने विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. त्यानंतर विभागीय प्रशासनामार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.
दरम्यान मनपा आयुक्त जी. श्रीकांत व उपायुक्त संतोष वाहूळ यांच्या विरोधात घोषणाबाजीने रस्ते दणाणून गेले. दिल्लीगेट येथे उभारलेल्या स्टेजवर झालेल्या सभेत विविध संघटनांच्या नेत्यांनी कारवाईला कडाडून विरोध दर्शविला. तसेच पुनर्वसन, मोबदला व पूर्वसूचना न देता कोणतीही कारवाई न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चात दीपक निकाळजे, अरविद कांबळे, दीपक केदार, अमित वाहुळ, जयश्री शिरके, विष्णू जगताप, आनंद कस्तुरे, जयेश अभंग, मनोज जाधव, विष्णू वखरे, नौशाद उस्मान, एच. एम. देसरडा, किरण तुपे, मिलिंद बनसोडेसह संख्येने समाजबांधव, पीडित नागरिक, गायरानध-हजारोंच्या संख्येने शहरवासीय उपस्थित होते.
नेत्यांनी आरोप केला की, कारवाईपूर्वी कोणतीही नोटीस, मोजणी, मोबदला किंवा पंचनामा न करता हुकुमशाही पद्धतीने गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर चालवला जात आहे. दोन वर्षांत शहरात पाणी आणता न येणाऱ्या आयुक्तांनी विकासाच्या नावाखाली गरिबांचे संसार उद्ध्वस्त केले, असा घणाघात दीपक निकाळजे यांनी केला. श्रीमंतांच्या सोयींसाठी गरिबांची घरे पाडली जात असल्याचा आरोप दीपक केदार यांनी करत, कारवाई थांबली नाही तर नागरिकांचा रोष ओढावेल, असा इशाराही दिला आहे.
दरम्यान मोर्चात आयुक्त जी. श्रीकांत हटाव, शहर बचाव, गरिबांची घरे पाडणाऱ्या मनपा आयुक्त आणि सरकारचा निषेध असो, होश मैं आओ.. होश में आओ, सरकार, होश में आओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.