

Sambhajinagar City ready to bid farewell to Lord Ganesha
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात शुक्रवारी (दि. २५) लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी शहर पूर्णपणे सज्ज झाले आहे. यंदाचा गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरळीत आणि पर्यावरणपूरक पार पडावा, यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३ हजारांवर पोलिस अधिकारी-अंमलदार, तर नागरी सुविधांसाठी महापालिकेचे १,४५० कर्मचारी असा तब्बल साडेचार हजार जणांचा मोठा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे. यंदा शहरात २४१ सार्वजनिक गणेश मंडळे आणि अंदाजे १ लाख ६५ हजार घरगुती बाप्पांना निरोप दिला जाणार आहे.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. ४ पोलिस उपायुक्त, ७ सहायक आयुक्त, ३८ पोलिस निरीक्षक, १४७ उपनिरीक्षक/सहायक निरीक्षक आणि २४३४ अंमलदारांची फौज रस्त्यावर असेल. सोबतच एसआरपीएफ, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि ५०० होमगार्ड्स तैनात आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मिरवणूक मार्गावर कोणीही विनापरवाना किंवा प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवल्यास तो 'अँटी ड्रोन गन'च्या साहाय्याने थेट पाडण्यात येईल, असा सक्त इशारा पोलिसांनी दिला आहे. मिरवणुकांवर पोलिसांच्या ८ अधिकृत ड्रोनची आणि कमांड कंट्रोल सेंटरची 'ईगल आय' नजर राहील. घातपात तपासणीसाठी ३ बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथके गस्त घालणार आहेत.
बाहेरच्या डीजेंना वेशीवरच रोखणार; २८ 'नॉईस मीटर'ची नजर विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर डीजे चालकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या डीजेंना वेशीवरच रोखण्यात आले असून, शहरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषणावर कारवाई करण्यासाठी पोलिस निरीक्षकांना २८ 'नॉईस लेव्हल मीटर' देण्यात आले आहेत. लाऊडस्पीकरसाठी केवळ 'दोन टॉप आणि दोन बेस'लाच परवानगी आहे.
पर्यावरणपूरक विसर्जन आणि क्यूआर कोड सुविधा
पर्यावरणपूरक विसर्जनाला चालना देण्यासाठी शहरात ४७ मूर्तीदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासाठी विशेष 'क्यूआर कोड' जारी करण्यात आला असून, तो स्कॅन केल्यास भाविकांना थेट जवळच्या मूर्तीदान केंद्राचा मॅप मिळणार आहे. रस्त्यावर मूर्ती आणि निर्माल्य पडू नये म्हणून ५० मूर्ती संकलन व ४५ निर्माल्य संकलन वाहने तैनात आहेत.
मनपाची जय्यत तयारी; यंदा क्रीडा संकुलातही विसर्जनाची सोय
विसर्जनस्थळी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेचे १,४५० कर्मचारी आणि १५३ वाहने तैनात आहेत. शहरात जिल्हा परिषद मैदान, औरंगपुरा, हडको एन-१२, शिवाजीनगर यांसह २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात ११ नैसर्गिक जलस्रोत आणि १० कृत्रिम तलावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील विहीर विसर्जनासाठी खुली करण्यात आली आहे.