

New Advanced TPU Project Worth ₹118 Crore in Waluj
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गरवारे हाय-टेक फिल्म्स लिमिटेड आणि जागतिक अग्रगण्य कंपनी लुब्रिझोल यांनी थर्मोप्लास्टिक पॉलीयूरेथेन (टीपीयू) तंत्रज्ञानाच्या विकास व उत्पादनासाठी मुंबईत बुधवारी सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत गरवारे कंपनी वाळूज येथील त्यांच्या कारखान्यात ११८ कोटी रुपयांचा नवीन प्रगत टीपीयू निष्कर्षण (एक्स्टूजन) प्रकल्प उभारणार आहे.
याद्वारे प्रगत टीपीयू-आधारित फिल्म्स आणि उच्च दर्जाच्या रंग-संरक्षण फिल्म्सच्या (पेंट प्रोटेक्शन फिल्म-पीपीएफ) स्थानिक उत्पादनाला मोठी चालना मिळणार आहे. वाळूज येथील प्रकल्पासाठी सुमारे ११८ कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून, हा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यामुळे गरवारे कंपनीला पीपीएफ उत्पादनासाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल (टीपीयू फिल्म) स्वतःच तयार करणे शक्य होईल. एकूण गुंतवणुकीपैकी २५% रक्कम नवीन उत्पादनांच्या विकासासाठी आणि तंत्रज्ञानविषयक क्षमतांच्या निर्मितीसाठी वापरली जाईल. या प्रकल्पामुळे कंपनीची पीपीएफ उत्पादन क्षमता ६०० एलएसएफ पेक्षा अधिक वाढणार आहे. नफ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.
उच्च उत्पादने विकसित करण्याचे उद्दिष्ट
कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्षा मोनिका गरवारे म्हणाल्या, ही भागीदारी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानावर आधारित विशेष फिल्म्स व्यवसाय उभारण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.लुब्रिझोलच्या जागतिक दर्जाच्या टीपीयू तंत्रज्ञान आणि आमच्या अभियांत्रिकी व उत्पादन क्षमतांशी सांगड घालून नवीन व उच्च-मूल्याची उत्पादने विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रगत उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र
लुब्रिझोल आयएमईएचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष अभिषेक श्रीवास्तव म्हणाले, वाढती देशांतर्गत मागणी आणि स्थानिकीकरणावर भर यामुळे भारत प्रगत उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनत आहे. गरवारेसोबतची ही भागीदारी भारतीय बाजारपेठेसाठी उच्च-कार्यक्षमतेच्या उपायांच्या विकासाला पुढे नेण्याच्या आमच्या समान दृष्टिकोनाचे प्रतीक आहे