

Citizens blocked the train for Rajnagar subway
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राजनगर मुकुंदनगर वॉर्ड क्र. ९० येथील नागरिकांना शहरात येण्यासाठी असलेला छोटासा भुयारी मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या परिसरातील रहिवाशांनी सोमवारी (दि. २१) दुपारी १२ वाजता मनमाडकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वेला अर्धा तास रोखून धरले होते. माहिती कळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली व मालगाडीला रस्ता मोकळा करून दिला. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
या नगरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून किंवा तेथेच असलेला एकमेव छोटासा भुयारी मार्ग वापरावा लागत होता. तोही मार्ग बंद करण्याचा निर्णय नुकताच रेल्वे प्रशासनाने घेतल्याचे समजताच परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी गेट न.५६ जवळील राजनगर परिसरात रुळावर ठिय्या मांडला. यामुळे जालन्याहून मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीला तब्बल अर्धा तास ताटकळावे लागले. नागरिकांनी मालगाडी रोखल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना बाजूला करून मालगाडीला मार्गस्थ केले. या आंदोलनामुळे अनेक वाहनधारकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून रोज ये-जा करावी लागत आहे. अशातही आहे तो रस्ता बंद करण्यात येत आहे. आम्ही शहरात यायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करत आगोदर भुयारी मार्ग करा, त्यानंतरच हा मार्ग बंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने या परिसरात रेल्वे सुरक्षा दलाचा काही काळ बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या नागरिकांची समजून काढून यावर तोडगा काढला. दरम्यान ही मागणी मान्य होईपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करणार असल्याचा निर्धार येथील नागरिकांनी केला आहे.