

Farmers' negligence in paying crop insurance
संजय मुचक
कन्नड : नव्या पीक विमा योजनेत पीक हाती फारसे येईल की नाही याची चर्चा शेतकऱ्यांत आहे. पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून सध्यातरी दिसते आहे.
यंदाच्या खरीप हंगाम २०२५ मध्ये १७ जुलैपर्यंत २८ हजार १३६ शेतकऱ्यांनी पीक विमा भरणा अर्ज केले आहे. यापैकी १३ हजार ९३ शेतकऱ्यांनी १३ हजार ३८२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा वेग ३१ जुलैपर्यंत असाच कायम राहिला आणि काही दिवसांची मुदतवाढ मिळाली तरी अर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३० हजारांचा तरी टप्पा ओलांडेल का, याबाबत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे.
एक रुपयात पीक विमा योजना बंद करून राज्य शासनाने खरीप हंगाम २०२५ साठी सुधारित पीक विमा योजना लागू केली. शेतकऱ्यांना खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांसाठी दोन टक्के तर कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहभागात लक्षणीय घट दिसून येत आहे. यंदा खरिपात कमी विमा अर्ज येण्यामागे मफार्मर आयडीफ्ची सक्ती हेही प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. बहुसंख्य शेतकऱ्यांकडे सध्या मफार्मर आयडीफ नाही. सर्वाधिक नुकसानभरपाई मिळणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर सुधारित योजनेत वगळण्यात आले आहेत. केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे.
एक रुपयात पीक विमा योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, पण त्या योजनेत गैरप्रकारांचेही पेव फुटले होते. बोगस शेतकऱ्यांच्या नावाने विमा काढणे, शासकीय जमिनी, पडीक जमिनी, गायरानांच्या जमिनीवर विमा काढणे, असे प्रकार वाढीस लागले होते.
अतिवृष्टी झाल्यावर जेव्हा शेतकरी ऑनलाईन तक्रार करतो, त्यानंतर सदर विमा कंपनी नुकसान पाहणीसाठी कंत्राटी पद्धतीवर नेमणूक केलेले स्थानिक कर्मचारी यांच्याकडून नुकसान अहवाल मागवतात. मर्जीतील, जवळचे नातेवाईक यांचे नुकसान जास्त दाखवून त्यांना मोबदला जास्त मिळवून दिला जातो, अशा तक्रारी आहेत. स्थानिक कर्मचाऱ्यांकडून पाहणी न करता इतर निः पक्षपाती कर्मचाऱ्यांकडून पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कन्नड तालुक्यात पीक विमा रक्कम वाढून देतो म्हणून दलाल सक्रिय झाले आहे. तुमचे नुकसान जास्त दाखवतो मग तुम्हाला नुकसान भरपाई जास्त मिळेल, असे आमिष दाखवून प्रतिशेतकऱ्याकडून पाचशे ते हजार रुपये वसूल केले जातात, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर काही शेतकऱ्यांनी दिली आहे.
तालुक्यातील काही गावांत उसाचे क्षेत्र सत्तर ते ऐंशी टक्के असताना त्याच गावात मका, कापूस आदी पिकांचा विमा जास्त मिळतो. हा प्रकार बोगस पीक विमामध्ये मोडत असल्याने या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.