

Illegal mining of murrum A Pokleen seized, action taken by the Upper Tehsil Office
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरालगतच्या गांधेली परिसरातील बाग तलावालगत काही दिवसांपासून अवैधरीत्या मुरूम उत्खनन सुरू होते. अप्पर तहसीलच्या पथकाने सोमवारी (दि. २१) अचानक तिथे धाड मारली. मात्र पथकाची चाहूल लागताच गौण खनिज चोरटे दोन हायवा आणि एक पोकलेन घेऊन पळून गेले. राहिलेला एक पोकलेन - तहसीलच्या पथकाने जप्त केला.
जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आणि मुरूम व दगड उत्खनन सुरू आहे. त्याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. त्यात शहरालगत गांधेली भागात बाग तलावाशेजारी काही दिवसांपासून बेकायदा मुरूम खोदून नेला जात असल्याची माहिती अप्पर तहसीलच्या पथकाला मिळाली.
त्यानंतर अप्पर तहसील परेश चौधरी, मंडळ अधिकारी संतोष लोळगे, मंडळ अधिकारी शेखर शिंदे, ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मी सोळंके, गंगा जगताप आदींनी सोमवारी तिथे अचानक धडक दिली. त्यावेळी तिथे दोन पोकलेनने खोदकाम करून दोन हायवांमध्ये मुरूम भरण्याचे काम सुरू होते.
परंतु पथक येत असल्याचे दुरून पाहताच त्यातील दोन हायवा आणि एक पोकलेन घेऊन पसार होण्यात गौण खनिज चोरटे यशस्वी झाले. त्यानंतर पथकाने तिथे असलेले एक पोकलेन जप्त करून तहसील कार्यालयात आणून जमा केले. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली.