

Sambhajinagar Anant Chaturdashi Ganesh idol immersion
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
पारंपरिक वाद्यांचा गजर, गुलालाची मुक्त उधळण, गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहाचे दर्शन लाडक्या बाप्पांना शनिवारी निरोप देताना घडले. छत्रपती संभाजीनगरहात सकाळपासून मूर्ती विसर्जनाला प्रारंभ झाला होता. या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत रंगल्या. अमाप उत्साह आणि चैतन्यदायी वातावरण हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य. जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, लातुरातही मिरवणुका शांततेत पार पडल्या.
शनिवारी दुपारीच घरगुती व गणेश मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. जि.प. मैदान, हडको, चिकलठाणा आदी भागात विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. कार्यकर्त्यांसह परिसरातील महिलांकडून आरती, औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत, फुलांच्या पायघड्यावरून गणेशमूर्ती मंडपाबाहेर आणल्या जात होत्या. सजवलेल्या वाहनातून मूर्ती सहभागी होत होती.
ढोल-ताशा, झांजपथक, लेझीम आदी पारंपरिक वाद्यांचा गजर करत, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मिरवणूक पुढे सरकत होती.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवारी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ६०० ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले. हिंगोली शहरात पालिकेने सहा ठिकाणी उभारलेल्या अमृतकुंडामुळे गणेश भक्तांची मोठी सोय झाली होती. तर काही गणपती मंडळांकडून रविवारी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. परभणी महापालिकेच्या २१ सजविलेल्या वाहनांद्वारे घरोघरी जाऊन मूर्तीचे संकलन शनिवारी (दि.६) करण्यात आले.जालन्यात काहीसा तणाव जालना शहरात काही दिवसांपूर्वी अस्लम कुरेशी या आरोपीने वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता त्यानंतर हिंदुत्ववादी समाज बांधवांकडून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस गणेश विसर्जन होण्याच्या आत अटक करण्याची मागणी सकल हिंदू समाज बांधवांनी केली होती.
शनिवारी आरोपींना अटक न झाल्याने गणेश महामंडळांनी विसर्जन करणार नसल्याची भूमिका घेतली यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत गणेश मिरवणूकीस सुरुवात झाली नव्हती. हिंदुत्ववादी संघटनांनी अस्लम कुरेशी व इतर आरोपींवर दाखल करण्यात आलेली कलमे ही जामीन पात्र असून ती बदलून त्यांना जामीन मिळणार नाही अशी कलम लावावेत अशी मागणी केली कत्तलखाने किती दिवसात जमीनदोष करणार याबाबत लेखी द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर चर्चा यशस्वी झाल्याने मिरवणुकांना सुरवात झाली.
नांदेडला डीजेमुक्त मिरवणूक अकरा दिवसांच्या आराधनेनंतर शनिवारी नांदेडसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत श्री विसर्जन मोठ्या भक्तिभावाने उत्साहात पार पडले. नांदेडलगत असलेल्या गाडेगाव येथे दोन तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. जिल्हा व पोलीस प्रशासनाने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झाली नाही.
शिवाय यंदा प्रथमच डीजेमुक्त विसर्जन मिरवणुका पारंपरिक पद्धतीने पार पडल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. राहटी येथील जलशुध्दीकरण केंद्राजवळील बनविण्यात आलेल्या कृत्रिम तलावात तब्बल ३५ हजार २९७गणेशमूर्तीचे विसर्जन मोठ्या उल्साहाच्या वातावरणात करण्यात आले. विसर्जनाची प्रक्रिया ही रात्री उशिरा १ वाजेपर्यंत सुरू होती. मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन प्रमुख मिर्झा तन्वीर बेग, मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड व त्यांच्या टीमने विशेष योगदान दिले.