छत्रपती संभाजीनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडला. यंदा पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीत डी जे चा गोंगाटा नव्हता. पारंपरिक वादन, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीभावाने हजारो भाविकांनी "गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला.
यंदा तब्बल १,८५० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आणि २५ हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून विशेष नियोजन करण्यात आले होते.
४१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे
२१ कृत्रिम तलाव व विहिरींची निर्मिती
नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला चांगला प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या.
संपूर्ण शहरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत सुमारे ३५० ढोल-ताशा पथकांनी गगनभेदी वादन केले. तसेच 100 हून अधिक मंडळांनी पारंपरिक तालावर नृत्य सादर केले. मिरवणुकीत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हजारो पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात
शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिरवणुकीवर लक्ष ठेवले
वाहतुकीसाठी १०० हून अधिक वाहतूक पोलिसांची विशेष नियुक्ती
दिवसभर भक्तिगीत, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक नृत्यांच्या तालावर संभाजीनगर शहर दुमदुमले. "गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषात भक्तांनी गणरायाला निरोप दिला.