

पैठण : पैठण तालुक्यातील संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मगाव असलेल्या आपेगाव येथील मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीवरील पुलावरुन रविवारी दि.७ रोजी दुपारी एका तरुणाने वाहत्या पाण्यात उडी घेतली असून. या पाण्यात बुडालेल्या तरुणाच्या शोधार्थ पोलीस व छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलाच्या बचाव पथक कर्मचाऱ्यांनी शोध घेण्याचा शर्यतीचा प्रयत्न केला. मात्र अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात येऊन आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली आहे
ज्ञानेश्वर कुंडलिकराव औटे वय ४७, रा. आपेगाव असे उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहेत. याबाबत माहिती अशी की, रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपेगाव उच्च बंधाऱ्याजवळील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीवरील पुलावरुन ज्ञानेश्वर औटे याने उडी घेतली. ही घटना रहदारी करणाऱ्या नागरिकाच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली.
मात्र ज्ञानेश्वर गोदावरी नदीत पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने पाण्यात वाहून गेला. सदर घटना ग्रामस्थांनी पोलिसांना कळविताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी बीट अंमलदार नसरुद्दीन शेख, राजेश आटोळे, होमगार्ड भागवत औटे, अजय पहिलवान, दिलीप प्रव्हाणे, ज्ञानेश्वर वैष्णव यांचे पोलिस पथक घटनास्थळी पाठवले. तसेच शोध मोहीमेस छत्रपती संभाजीनगरहून महानगरपालिकचे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाचे पथक प्रमुख लक्ष्मण कोल्हे, संग्राम मोरे, प्रनाल सुर्यवंशी, सचिन शिंदे, विजय कोथमिरे, जगदिश गायकवाड, वाहनचालक चंद्रसेन गिते यांनी बोटीद्वारे गोदापात्रात शोध घेतला मात्र मृतदेह सापडला नाही. अंधार झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. मोहीम सकाळी पुन्हा सुरु केली जाणार असून या घटनेमुळे आपेगाव परिसरात खळबळ उडाली असून. शोध मोहीम राबवितावेळेस पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाने गोदावरी नदीत उडी का घेतली या संदर्भात पैठण पोलीस पथक पुढील तपास करीत आहे.