

Sambhajinagar: 117 villages and manors in the district are facing water shortage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिक गंभीर होत असून ऑक्टोबरच्या मध्यातच ९७ गावे आणि २७वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावांना सध्या १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात गंगापूर या संभाव्य टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी (दि. १४) दुष्काळ आढावा बैठकीत प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, संतोष गोरड, तहसीलदार शिवानंद बिडवे, सुनील सावंत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आणि विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. या बैठकीत पाणीटंचाई निवारणासाठी विहिरींचे अधिग्रहण व खोलीकरण, विंधन विहिरी, नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आणि तात्पुरत्या पाइपलाइन यांसारख्या उपाययोजना प्राधान्याने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामेही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासोबतच वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यांतील पाणीटंचाईवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत. ग्राम महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस टंचाईग्रस्त गावांची संयुक्त पाहणी करावी, असे निर्देशही देण्यात आले.
टँकरच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवा
टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. टँकरच्या फेऱ्या, पाण्याचे प्रमाण, वेळापत्रक आणि वितरणाची नियमित तपासणी करा. त्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा, असेही जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.
गंगापूरमध्ये सर्वाधिक ६७ टँकर
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ६७टँकर सुरू असून, पैठणमध्ये ४९, वैजापूरमध्ये २८, छत्रपती संभाजीनगरात १६ आणि फुलंब्रीत १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ७० विहिरींचे अधिग्रहण केल्या आहेत. त्यातील ६० विहिरी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी आहेत.