

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस, माझ्याशी गद्दारी करत आहेस, असा आरोप लावत दोन मित्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांचे उत्सव चौकातून थार गाडीत अपहरण केले. त्याला रात्रभर कोंडून ठेवत बेल्ट आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार अपहरणकर्त्यांविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक १७ वर्षांचा युवक उस्मानपुरा भागातील एका कोचिंग सेंटरमध्ये नीटची तयारी करत आहे. ७ जून रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान हा युवक उत्सव चौकातून जेवण करण्यासाठी जात असताना त्याच्या ओळखीचे अनिकेत कणसे आणि अजय या दोघांनी त्याला बाजूलाच उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या थार गाडीत बळजबरीने बसवले. या गाडीत या दोघांव्यतिरिक्त आणखी दोन तरुण होते.
त्या युवकाला घेऊन ही थार गाडी प्रतापन-गरच्या मैदानात गेली. तेथे अनिकेतने त्या युवकला तू माझ्या प्रेयसीसोबत का बोलतो, असे म्हणत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
रात्रभर मारहाण केल्यानंतर, सकाळी अप-हरणकर्त्यांनी त्या युवकाला रविवारी सकाळी रूमवर सोडले. रूमवर सोडतानाही त्याच्या मित्रांनी पुन्हा तिच्याशी बोललास तर तुला जिवे मारेन, अशीही धमकी दिली.
या प्रकरणात पीडित युवकाच्या तक्रारीवरून अनिकेत कणसे, अजय, महेश व अनोळखी एक व्यक्तीच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरणकर्त्या युवकांनी त्यांची गाडी साई टेकडी, सातारा परिसराकडे नेली. या ठिकाणी चौघांनी कमरेच्या बेल्ट, लोखंडी रॉडने त्याला रात्रभर मारहाण केली. ती पूर्ण रात्र त्याला गाडीतच कोंडून ठेवले. सकाळ होताच त्याला ८ जून रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान जखमी असस्थेत रूमजवळ सोडून दिले.