

A container crashed into a cowshed, killing two goats and injuring a buffalo
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा :
भरधाव कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर हॉटेलच्या कंपाऊंडमधून बाजूलाच असलेल्या गोठ्यात घुसला. यात २ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, एक म्हैस जखमी झाली आहे. यात सुदैवाने मानवहानी झाली नाही. हा अपघात रविवारी (दि.८) पहाटे ४ वाजेच्या सुमारास हर्मूल कचरा डेपोच्या शेजारी घडला. याप्रकरणी ट्रकचालकावर (क्र. डीडी १ यू ९९५६) हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंगीकडून येत असलेल्या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर थेट एका हॉटेलचे कंपाऊंड तोडत बाजूलाच असलेल्या गोठ्यात शिरला. त्यात शेडचे नुकसान झाले असून, त्यात असलेल्या दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या. १ शेळी व म्हैस जखमी झाली आहे.
पहाटेची वेळ असल्याने येथे कोणीही नव्हते. त्यामुळे मानवहानी टळली. या प्रकरणी ट्रकचालक योगेश भीमराव पगारे (४६, रा. वडीगोद्री, जि. जालना) याच्याविरुद्ध हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गोठ्यातील पशुंना चारापाणी करण्यासाठी दररोज पहाटे चार ते पाचच्या सुमारास औताडे कुटुंबातील एखादा सदस्य येत असतो. ते गोठ्यात येण्या आधीच हा अपघात घडला. या अपघातादरम्यान कोणीही मनुष्य उपलब्ध नसल्याने मानवहानी टळली. अपघातात जखमी शेळी, म्हैस यांच्यावर उपचार करण्यात आले.