

110 roads have not been transferred even after the Smart City deadline has expired
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मुदत संपूनही अद्याप शहरातील ११० पैकी ४ रस्त्यांची कामे अपूर्णच आहेत. साडेतीन वर्षांत चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही १०६ रस्तेच काँक्रीटीकरणासह पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करून सर्व रस्ते महापालिकेला हस्तांतर करा, असे आदेश सोमवारी (दि.९) प्रशासक जी. श्रीकांत यांनी आढावा बैठकीत स्मार्ट सिटीला दिला.
राज्य शासनाच्या निधीतून मागील दहा वर्षांत शहरातील अनेक रस्त्यांची कामे महापालिकेने केली. त्यानंतरही शहरातून बहुतांश रस्त्यांची कामे शिल्लक होती. त्यामुळे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट त कॉर्पोरेशनच्या निधीतून महापालिका हद्दीतील १११ रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि रोड फर्निचर करण्याचा निर्णय तत्कालीन प्रशासक तथा स्मार्ट सिटी सीईओ आस्तिककुमार पाण्ड्ये यांनी घेतला होता. यासाठी ३१७ कोटी खर्चाची निविदा काढून एकाच कंत्राटदाराला काम देण्यात आले. हे काम अतिशय धिम्या गतीने सुरू होते. त्यामुळे यातील काही रस्त्यांचे काम आमदार, खासदारांच्या निधीतून करण्यात आले. तर त्या रस्त्यांऐवजी स्मार्ट सिटीला इतर भागातील रस्ते वर्ग करण्यात आले.
सोमवारी प्रशासकांनी या ११० रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यात बहुतेक रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे आढळले. मात्र असे असतानाही अद्याप त्यातील एकही रस्ता स्मार्ट सिटीने महापालिकेकडे हस्तांतरित केला नाही, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यावरून प्रशासक स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर संतापले. मात्र तांत्रिक कारणामुळे रस्त्यांचे हस्तांतरण बाकी आहे, असे स्मार्ट सिटीकडून सांगण्यात आले. त्यावर सप्टेंबरची डेडलाईन देत रस्ते हस्तांतर करण्याचे आदेश मनपा प्रशासकांनी दिले.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलेले रस्ते जोपर्यंत महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार नाहीत, तोपर्यंत रस्त्यांच्या कामाचे पेमेंट करणार नाही, असा इशारा प्रशासक जी. श्रीकांत यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत स्मार्ट सिटीला दिला.
मयूरपार्क, आनंद गाडे चौक, कांचनवाडी येथील सैनिक विहार या ठिकाणच्या रस्त्यांचे काम अतिक्रमण आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे रखडले आहे. या अडचणी तपासून त्या मार्गी लावण्यासाठी प्रशासकांनी चार अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली. या समितीमध्ये स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिक्रमण हटाव प्रमुख, मनपा रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता, नगर रचना विभागाचे उपसंचालकांचा समावेश आहे.