

वाळूज महानगर : साजापूर ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २८) मतदान घेण्यात आले. यात १२८७मतदारांपैकी ९५३ जणांनी मतदान केले. बुधवारी (दि.२९) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साजापूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील ग्रामपंचायत सदस्या बानोबी अयुब शेख यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. रिक्त झालेल्या एका जा-गेसाठी मंगळवारी साजापूर येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान घेण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती. तसेच उमेदवाराकडून वयोवृद्ध मतदारांना ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आल्याने अनेक वयोवृद्ध मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र शेवटचा एक-दिड तास बाकी असतांना मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढल्याने सहा वाजेपर्यंत मतदान सुरु होते.
शरीफा शेख, सबा शेख, रुक्सना सय्यद व जमीला शेख हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. एकूण १२८७मतदारापैकी ९५३ मतदारांनी आपला हक्क बजावला. आज बुधवारी मतमोजणी होणार असून कोणत्या उमेदवाराचे भाग्य उजळेल याकडे साजा पूर येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. निवडणुकी दरम्यान क्षेत्रीय अधिकारी संजय राठोड, संदीप मांडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद रिढे हे मतदान केंद्रावर लक्ष ठेवून होते. मतदानावेळी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वाद
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मतदान केंद्राबाहेरील साजापूर- वडगाव रस्त्यावर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ वाद झाला. यामुळे काही वेळासाठी याठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.